सध्या न्यूझीलंड संघ बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये ५ टी -२० सामन्यांची मालिका सुरू आहे. या टी -२० मालिकेतील पहिल्या सामन्यात निराशाजनक कामगिरी केल्यानंतर दुसऱ्या टी -२० सामन्यातही न्यूझीलंड संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. दुसऱ्या टी -२० सामन्यात बांगलादेश संघाने न्यूझीलंड संघाला अवध्या ४ धावांनी पराभूत केले आहे. यासह टी -२० मालिकेत २-० ची आघाडी घेतली आहे.
शेर ए बांगला स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात बांगलादेश संघाचा कर्णधार महमदुल्लाहने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना मोहम्मद नइम आणि लिटन दास यांनी बांगलादेश संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. दोघांनी मिळून ९.३ षटकात ५९ धावा केल्या होत्या.
या डावात बांगलादेश संघाकडून मोहम्मद नइमने सर्वाधिक ३९ धावांची खेळी केली होती. तर कर्णधार महमदुल्लाहने नाबाद ३७ धावांची खेळी करत महत्वपूर्ण योगदान दिले होते. या खेळीच्या जोरावर बांगलादेश संघाला २० षटकांअखेर ६ बाद १४१ धावा करण्यात यश आले होते.
बांगलादेशच्या फिरकी गोलंदाजांसमोर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी टेकले गुडघे
न्यूझीलंड संघाला हा सामना जिंकण्याची सुवर्णसंधी होती. १२० चेंडूंमध्ये त्यांना अवघ्या १४२ धावा करायच्या होत्या. परंतु, फिरकी गोलंदाजांना मदत मिळणाऱ्या खेळपट्टीचा बांगलादेशचा गोलंदाजांनी पुरेपूर फायदा घेतला. मेहदी हसनने टॉम ब्लंडेलला अवघ्या ६ धावांवर बाद केले होते. त्यानंतर शकीब अल हसनने रूचीन रवींद्रला अवघ्या १० धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले होते.
परंतु कर्णधार टॉम लेथम आणि विल यंग यांनी महत्वपूर्ण भागीदारी करत न्यूझीलंड संघाचे सामन्यातील आव्हान टिकवून ठेवले होते. टॉम लेथमने या सामन्यात अर्धशतकी खेळी केली. मात्र, अन्य कोणालाही खास काही करता आले नाही. न्यूझीलंडने २० षटकांअखेर ५ बाद १३७ धावाच केल्या. (Bangladesh beat newzealand in 2nd T20I by 4 runs)
शेवटच्या षटकातील रोमांच
शेवटच्या षतकात न्यूझीलंड संघाला विजयासाठी २० धावांची आवश्यकता होती. तर गोलंदाजी करण्यासाठी मुस्तिफिजुर रहमान गोलंदाजीला आला होता. षटकातील पहिल्या ४ चेंडूवर त्याने ७ धावा खर्च केल्या होत्या. दरम्यान शेवटच्या २ चेंडूंवर १३ धावांची आवश्यकता होती. परंतु ५ वा चेंडू रहमानने ‘नो बॉल’ फेकला,ज्यावर लॅथमने चौकार मारला.
त्यानंतर न्यूझीलंड संघाला विजय मिळवण्यासाठी २ चेंडूंमध्ये ८ धावांची आवश्यकता होती. त्यावेळी रहमानने २ चेंडूंमध्ये अवघ्या ३ धावा खर्च केल्या आणि हा सामना बांगलादेश संघाने ४ धावांनी आपल्या नावावर केला.
महत्त्वाच्या बातम्या –
जार्वोच्या एन्ट्रीवर जाफरने ‘हे’ फनी मीम शेअर करत इंग्लंडच्या सुरक्षा यंत्रणेची उडवली खिल्ली
ओव्हलच्या मैदानावर उमेश यादवचा मोठा कारनामा! ‘या’ विक्रमाच्या बाबतीत केली जहीर खानची बरोबरी
ऑली पोपने शार्दुलला दिला चांगलाच चोप, एकाच षटकात ठोकले सलग ४ चौकार, पाहा व्हिडिओ