टी-२० विश्वचषक स्पर्धेला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे सर्व संघांची आता जोरदार तयारी चालू आहे. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया संघाने टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी आपला १५ सदस्यीय संघ जाहीर देखील केला आहे. दरम्यान न्यूझीलंडचा संघ सध्या ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी बांगलादेश दौऱ्यावर आहे. यामध्ये बुधवारी (१ सप्टेंबर) बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी-२० सामना पार पडला.
या सामन्यात यजमान बांगलादेश संघाने न्यूझीलंडवर दमदार विजय मिळवला. यासह बांगलादेशचा संघ या मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, न्यूझीलंडचा हा निर्णय पूर्णपणे फेल ठरला. पहिल्या डावात न्यूझीलंडचा संघ १६.५ षटकांमध्ये केवळ ६० धावांवर सर्वबाद झाला.
यामध्ये न्यूझीलंडचा फलंदाज टॉम लॅथमने सर्वाधिक १८ धावा केल्या, तर हेंड्री निकोल्सनेही १८ धावांचे योगदान दिले. या दोघांना सोडून न्यूझीलंडचा एकही फलंदाज चांगली खेळी करू शकला नाही. बांगलादेशकडून गोलंदाजी करताना मुस्तफिजुर रहमानने १३ धावा देऊन ३ विकेट्स घेतल्या. तर नसुम अहमद, शाकिब अल हसन आणि मोहम्मद सैफुद्दिन या तिघांनी २-२ विकेट्स घेतल्या.
ज्यानंतर बांगलादेशने मिळालेल्या या आव्हानाला ३० चेंडू शिल्लक असतानाच पार केले. बांगलादेशकडून खेळताना शाकिब अल हसनने सर्वाधिक २५ धावा केल्या. तसेच मुश्फिकुर रहीमने नाबाद १६ धावा केल्या आणि हा सामना ७ विकेट्सने जिंकला.
विशेष म्हणजे न्यूझीलंड संघाची ही आतापर्यंतची सर्वात निचांकी असलेली धावसंख्या होती. याआधीही श्रीलंकेने २०१४ साली न्यूझीलंडला ६० धावांत सर्वबाद केले होते. बांगलादेशने नुकत्याच ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या टी-२० सामन्यातदेखील ऑस्ट्रेलियाला केवळ ६५ धावांवर सर्वबाद केले होते. जे ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट इतिहासातील सर्वात निचांकी धावसंख्या होती. बांगलादेशने तो सामना ६० धावांनी जिंकला होता.
टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांमध्ये शाकिब दुसऱ्या क्रमांकावर
दरम्यान, शाकिब अल हसन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. १०४ विकेट्ससह शाकिब अल हसन दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर १०७ विकेट्ससह लसिथ मलिंगा पहिल्या क्रमांकावर आहे. शाकिबला मलिंगाचा हा विक्रम मोडण्यासाठी आता केवळ ४ विकेट्सची गरज आहे.
उर्वरित ४ टी-२० सामन्यात शकीबने ४ विकेट्स घेतल्यास मलिंगाला मागे टाकून तो टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनेल. टी-२० मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांमध्ये लसिथ मलिंगा (१०७) शाकिब अल हसन (१०४) टीम साऊदी (९९) शाहिद आफ्रिदी (९८), राशिद खान (९५) विकेट्ससह टॉप-५ मध्ये आहेत.
आतापर्यंत टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंडची सर्वात निचांकी धावसंख्या खालील प्रमाणे –
६० विरुद्ध बांगलादेश, २०२१
६० विरुद्ध श्रीलंका, २०१४
८० विरुद्ध पाकिस्तान, २०१०
८१ विरुद्ध श्रीलंका, २०१०
८६ विरुद्ध दक्षिण आफ्रिका, २०१२
महत्त्वाच्या बातम्या –
–बांगलादेशपुढे न्यूझीलंडचे फलंदाज निष्प्रभ, ९ जण एकेरी धावसंख्येवर बाद; टी२०तील नकोसा विक्रम नावे
–सुरेश रैनाचा ‘जॉन सिना’ अवतार, संघ सहकाऱ्याला अलगद ढकलले पाण्यात; व्हिडिओ व्हायरल
–कसोटी मालिकेत भारताची आघाडी पक्की? ‘या’ २ शिलेदारांचे ओव्हलवरील रेकॉर्ड वाचून इंग्लंडला फुटेल घाम