बांगलादेशचा संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून उभय संघांमध्ये ३ सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी (१८ मार्च) सेंच्यूरियन येथे झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकांमध्ये ७ विकेट्सच्या नुकसानावर ३१४ धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ ४९ षटकांमध्ये २७६ धावांवरच गारद झाला आणि बांगलादेशने ३८ धावांनी हा सामना जिंकला. यासह त्यांनी मालिकेत १-० अशी आघाडीही घेतली आहे. हा विजय बांगलादेशसाठी ऐतिहासिक ठरला आहे.
दक्षिण आफ्रिकेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बांगलादेश संघाचा हा पहिलावहिला वनडे सामना विजय आहे. हा बांगलादेशचा दक्षिण आफ्रिकेतील मैदानांवरील २० वा वनडे सामना होता. यापूर्वीच्या १९ वनडे सामन्यात बांगलादेशला पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. मात्र यावेळी त्यांनी ही पराभवाची मालिका तोडत नवा इतिहास रचला आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशकडून शाकिब अल हसनने सर्वाधिक ७७ धावांची खेळी केली होती. त्याने ६४ चेंडूंमध्ये ३ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने ही शानदार खेळी खेळली होती. त्याच्याव्यतिरिक्त यासिर अली आणि लिटन दास यांनीही प्रत्येकी ५० धावा जोडल्या होत्या. तसेच कर्णधार तमिम इकबालनेही ४१ धावांचे योगदान दिले होते. परिणामी बांगलादेशच्या संघाने ५० षटकांमध्ये ३१४ धावा फलकावर लावल्या होत्या.
That winning feeling 🙌
Bangladesh’s 38-run win in Centurion was their first ODI victory on South African soil.#SAvBAN | https://t.co/LBaOXJFA9B pic.twitter.com/WMcO4XGgfn
— ICC (@ICC) March 18, 2022
दक्षिण आफ्रिकेकडून मार्को जेन्सन आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच लुंगी एन्गिडी, कागिसो रबाडा आणि फुलकिवायो यांनीही प्रत्येकी एका विकेटचे योगदान दिले होते.
बांगलादेशच्या भल्यामोठ्या ३१५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेकडून रासि वॅन डर डूसेनने चिवट झुंज दिली. त्याने १ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने ८६ धावा चोपल्या. तसेच डेविड मिलरनेही ३ षटकार आणि ८ चौकारांच्या मदतीने ७९ धावांची तुफानी खेळी खेळली. मात्र इतर फलंदाजांना विशेष खेळी करता आल्या नाहीत. परिणामस्वरूप ४८.५ षटकांमध्येच दक्षिण आफ्रिकेचा संघ २७६ धावांवर सर्वबाद झाला.
या डावात मेहदी हसनने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तसेच तस्किन अहमद आणि शोरिफुल इस्लाम यांनी अनुक्रमे ३ आणि २ फलंदाजांना पव्हेलियनला धाडत संघाला विजय मिळवून दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
…अन् ‘त्याने’ सबंध क्रिकेटविश्वाला दाखवून दिले की आपण मुरलीधरनपेक्षा कमी नव्हतो
बरोबर १५ वर्षांपुर्वी १२७ किलो वजनाच्या क्रिकेटपटूने घेतला होता उथप्पाचा नेत्रदिपक झेल, पाहा व्हिडिओ