भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) २९ मे रोजी एक बैठक बोलावली असून यावर्षी भारतात होणाऱ्या टी 20 विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनाबद्दल त्यात चर्चा होणार आहे. एका सूत्राने ही माहिती मंगळवारी एएनआयला दिली आहे. वास्तविक, बीसीसीआयने 29 मे रोजी बैठक बोलावली आहे, कारण आयसीसीची बैठक 1 जून रोजी होणार आहे. यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी 20 वर्ल्ड कप भारतात होणार आहे व त्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.
सूत्राने सांगितले की,आयसीसीच्या बैठकीपूर्वी बीसीसीआय एक बैठक घेऊन भारतातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेणार आहे. जेणेकरुन टी20 विश्वचषकात कोणताही अडथळा येऊ नये. सूत्रांनी सांगितले की, ज्या शहरांचे नाव बीसीसीआयने निवडले आहे, त्यांचा बैठकीत पुन्हा विचार केला जाईल. या शहरांमध्ये कोरोनाची स्थिती कशी आहे याबद्दल बैठकीत चर्चा होणार आहे. याशिवाय या बैठकीत टी 20 विश्वचषक, आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आयोजन, महिला क्रिकेट या विषयावर चर्चा होणार आहे.
बीसीसीआयने टी 20 विश्वचषक स्पर्धेसाठी अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, धर्मशाला, हैदराबाद, कोलकाता, लखनऊ आणि मुंबई या 9 शहरांची निवड केली आहे. आता भारतातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन स्पर्धेच्या आयोजनासाठी आयसीसी या ठिकाणांची निवड करेल. ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत 16 देश सहभागी होणार आहेत. जर सर्व बाबी योग्य रित्या झाल्या तर या स्पर्धेचा अंतिम सामना 13 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे खेळवला जाणार आहे.
टी-20 विश्वचषकाची सुरुवात 2007 साली झाली असून, आतापर्यंत या स्पर्धेचे 6 हंगाम झाले आहे. यामध्ये वेस्ट इंडिज संघाने सर्वाधिक 2 वेळा जेतेपदावर नाव कोरले आहे. याशिवाय भारत, पाकिस्तान, इंग्लंड व श्रीलंका या संघांनी ही स्पर्धा प्रत्येकी 1-1 वेळा जिंकलेली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाकडून आगामी काळात चाहत्यांना टी-20 विश्वचषकाच्या विजेतेपदावर नाव कोरण्याची मोठी अपेक्षा असणार आहे.
हेही वाचा-
–हे भारीयं! दरवेळी विकेट घेतल्यानंतर मोहम्मद शमी विराट कोहलीला विचारतो हा महत्त्वाचा प्रश्न
–विराटला नावे ठेवण्याआधी त्याने केलेले हे काम नक्की पाहा, पाहा आता कुणाच्या आलाय मदतीला
–विराट, एबी, मॅक्सवेलला ७ चेंडूत बाद करणाऱ्या त्या युवा गोलंदाजाने सांगितला सामन्याआधीचा रितसर प्लॅन
–सेहवाग बनला कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन दूत, प्रसिद्ध केला हेल्पलाईन नंबर