बीसीसीआयने आयुष म्हात्रेच्या 19 वर्षांखालील विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघासाठी बक्षीस रकमेची घोषणा केली आहे. आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने शुक्रवारी, 6 फेब्रुवारी रोजी इंग्लंडचा 100 धावांनी पराभव करून विक्रमी सहाव्यांदा विजेतेपद पटकावले. भारताच्या विजयाचा नायक सलामीवीर वैभव सूर्यवंशी होता, ज्याने अंतिम सामन्यात 175 धावांची धमाकेदार खेळी केली. या खेळीसाठी वैभवला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या सूर्यवंशीने स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कारही जिंकला.
बीसीसीआय शुक्रवारी 6 फेब्रुवारी रोजी 2026 च्या 19 वर्षांखालील विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय 19 वर्षांखालील क्रिकेट संघासाठी 7.5 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर केली.
बीसीसीआयने त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “बीसीसीआयचे मानद सचिव श्री. देवजित सैकिया यांनी विजयी भारत अंडर-19 संघ, प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचारी तसेच ज्युनियर क्रिकेट समितीसाठी ₹7.5 कोटी रोख बक्षीस जाहीर केले आहे. ही घोषणा भारताच्या झिम्बाब्वेमध्ये झालेल्या सहाव्या आयसीसी अंडर-19 विश्वचषक विजयानंतर करण्यात आली आहे, ज्यामध्ये संघाने उत्कृष्ट कामगिरी केली आणि अपराजित राहिला.”
बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी 2026 च्या अंडर-19 विश्वचषक जिंकल्याबद्दल, संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिल्याबद्दल आणि अंतिम सामन्यात इंग्लंडला पराभूत केल्याबद्दल भारतीय अंडर-19 संघाबद्दल अभिमान व्यक्त केला. त्यांनी घोषणा केली की बीसीसीआय संघाला 7.5 कोटी रुपयांचे रोख बक्षीस देईल.
एएनआयशी बोलताना बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया म्हणाले, “2026 च्या अंडर-19 विश्वचषकातील विजयाबद्दल संपूर्ण देश आणि बीसीसीआयला आमच्या अंडर-19 संघाचा अभिमान आहे. आमच्या संघाने अंतिम सामन्यात इंग्लंडला ज्या प्रकारे पराभूत केले आणि स्पर्धेत ते ज्या प्रकारे अपराजित राहिले त्याचा आम्हाला सर्वांना अभिमान आहे. बीसीसीआय संघाला 7.5 कोटी रुपयांचे रोख बक्षीस देईल.”
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, वैभव सूर्यवंशीच्या स्फोटक खेळीच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना 411 धावा केल्या. वैभव सूर्यवंशीने फक्त 80 चेंडूत 15 चौकार आणि 15 षटकारांसह 175 धावा केल्या. कर्णधार आयुष म्हात्रेने 51 चेंडूत 53 धावा केल्या, तर अभिज्ञान कुंडूने 31 चेंडूत 40 धावा केल्या. इंग्लंडच्या कालेब फॉकनरने शौर्याने एकाकी झुंज दिली आणि 115 धावा केल्या, परंतु इंग्लंड सामना 100 धावांनी हरला.






