भारतीय महिला संघ मागील वर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या टी२० विश्वचषकात अंतिम फेरीत पोहोचला होता. अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागल्याने त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. मात्र काहीच दिवसांपूर्वी याबाबत एक धक्कादायक खुलासा झाला होता. या स्पर्धेची बक्षीस रक्कम बीसीसीआयने महिला खेळाडूंना दिलेच नसल्याचे वृत्त समोर आले होते.
आयसीसीकडून ही रक्कम बीसीसीआयला वर्ग करण्यात आली होती. मात्र बीसीसीआयने ती रक्कम खेळाडूंना वितरित केली नव्हती. मात्र आता याविषयी चर्चा सुरू झाल्यावर खेळाडूंना ही रक्कम देण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. भारतीय महिला संघ इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी त्यांना ही रक्कम देण्यात आली आहे.
प्रत्येक खेळाडूला जवळपास १९ लाख रुपये
बीसीसीआयने केवळ टी२० विश्वचषकाची बक्षीस रक्कमच नाही तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मायदेशातील मालिकेची मानधनाची रक्कम देखील थकवली होती. मात्र आता बीसीसीआयने या दोन्ही रकमांचे वितरण केले आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनुसार बोर्डाने मागील महिन्यात महिला खेळाडूंना या दोन्ही गोष्टींसाठी इनव्हॉइस पाठवायला सांगितले होते. ते येताच पुढील एक ते दोन दिवसांत विश्वचषक आणि टी२० मालिकेचे मानधन खेळाडूंना वितरित करण्यात आले. टी२० विश्वचषकासाठी खेळाडूंना जवळपास प्रत्येकी १९ लाख रुपयांचे मानधन देण्यात आले आहे.
मागील महिन्यात प्रसिद्ध झाले होते वृत्त
बीसीसीआयने महिला खेळाडूंचे हे मानधन थकवल्याचे वृत्त इंग्लंडमधील एका वृत्तपत्राने छापले होते. या वृत्तानुसार आयसीसीने मानधनाची रक्कम दोन आठवड्यांच्या आतच बीसीसीआयकडे वर्ग केली होती. मात्र बीसीसीआयने हे बक्षीस खेळाडूंना वितरित केले नाही. हे वृत्त समोर आल्यावर बीसीसीआयवर पुन्हा एकदा पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंमध्ये भेदभाव करण्याचा आरोप झाला होता. मात्र त्यानंतर बीसीसीआयने तातडीने पावले उचलत ही थकित रक्कम वितरित केली असून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
असे तीन दिग्गज खेळाडू, ज्यांना एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखाली निवृत्तीचा सामना खेळण्याची संधी मिळाली
‘हा’ खेळाडू भारताला जिंकून देईल पहिलेवहिले कसोटी चॅम्पियनशीपचे विजेतेपद, दीपक चाहरचा विश्वास
सरावादरम्यान मोठा अपघात, तोंडावर चेंडूचा फटका अन् यष्टीरक्षक रक्तबंबाळ; पडले ७ टाके