भारतात गेल्या दीड वर्षापासून कोरोनाचा विळखा पडला आहे. कोरोनाच्या सावटाखाली ९ एप्रिलपासून भारतात इंडियन प्रीमियर लीग २०२१ हंगामाची सुरुवात झाली आहे. परंतु मैदानावर खेळाडूंनी प्रवेश करायच्या आधीच कोरोनाची एन्ट्री झाली असल्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे.
मागील आठवड्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमच्या ग्राउंड स्टाफमधील काही कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात सापडले होते. तसेच मुंबईत आयपीएलचा सराव करत असलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाचा अष्टपैलू अक्षर पटेल यालाही कोरोनाची बाधा झाली होती. आज (१० एप्रिल) याच वानखेडे स्टेडियमवर आयपीएलचा दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. तत्पुर्वी खबरदारीचा उपाय म्हणून बीसीसीआयने वानखेडेत सामना पाहण्यासाठी येणाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे.
कोरोनाच्या सावटाखाली आयपीएल २०२१ चे सामना दर्शकांविना खेळवले जात आहेत. परंतु मॅच ऑफिशियल्स आणि खेळाडूंच्या कुटुंबियांना सामना पाहण्यास येण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र बीसीसीआयच्या निर्णयानुसार, आता सामना पाहण्यास येणाऱ्या मॅच ऑफिशियल्स किंवा खेळाडूंच्या कुटुंबियांना ४८ तासांपुर्वी आरटी-पीसीआर चाचणी करावी लागणार आहे आणि त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्यावरच त्यांना स्टेडियममध्ये प्रवेश देण्यात येणार आहे.
बीसीसीआयच्या या निर्णयाला मुंबई क्रिकेट असोसिएशननेही (एमसीए) संमती दिली आहे. एमसीएचे सचिव संजय नाईक यांनी याबद्दल पत्रात लिहिले आहे की, ‘मॅच ऑफिशियल्सपैकी ज्यांनी कोरोनाची लस घेतली आहे, त्यांच्यासाठीही सामन्याच्या ४८ तासपुर्वी कोरोना चाचणी करणे बंधनकारक आहे. वानखेडे स्टेडियमवर आयपीएल सामना पाहण्यासाठी येणाऱ्या मॅच ऑफिशियल्सना प्रत्येक सामन्यावेळी त्यांचा कोरोना अहवाल दाखवाणे अनिवार्य आहे.’
महत्त्वाच्या बातम्या-
बलाढ्य MI साठी कर्दनकाळ ठरला हर्षल; सामना विजयानंतर म्हणाला, ‘मला आधीच कल्पना आली होती…’