लंडनच्या ओव्हल मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघावर १५७ धावांनी विजय मिळवला. यासह कसोटी मालिकेत २-१ ने आघाडी घेतली आहे. या ऐतिहासिक विजयानंतर सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. परंतु, कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सामन्यापूर्वी केलेल्या कृत्त्यामुळे बीसीसीआयने निराशा व्यक्त केली आहे.
चौथा सामना सुरू होण्याच्या एक दिवसापूर्वी भारतीय कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी पुस्तक लाँच करण्याच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात भरपूर लोकांनी हजेरी लावली होती.
त्यानंतर रवी शास्त्री यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले होते. तसेच गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. ज्यामुळे त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. या कारणांमुळे रवी शास्त्री अंतिम कसोटी सामन्यात भारतीय संघासोबत नसणार आहेत.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, या कार्यक्रमादरम्यान एका खोलीत भरपूर लोक होती. तसेच विराट कोहली आणि रवी शास्त्री देखील तिथे उपस्थित होते. दरम्यान बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने म्हटले की, “या कार्यक्रमातील काही फोटो बीसीसीआयला शेअर करण्यात आले असून याची चौकशी करण्यात येणार आहे. ओव्हल कसोटी सामन्यानंतर कर्णधार कोहली आणि रवी शास्त्री यांना प्रश्न विचारले जातील. संघाचे प्रशासकीय व्यवस्थापक गिरीश डोंगरे यांचीही चौकशी सुरू आहे.”
तसेच ब्रिटीश माध्यमांनुसार, भारतीय संघाने या कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी ईसीबीकडून योग्य परवानगी घेतली नव्हती. तसेच अधिकाऱ्याने असेही म्हटले आहे की, बीसीसीआय ईसीबीच्या संपर्कात असून दोन्ही बोर्ड ही मालिका कुठलीही अडचण न येऊ देता पार पाडण्याच्या प्रयत्नात आहे. तसेच अशी आशा आहे की, रवी शास्त्री लवकरच ठीक होतील. बुधवारी (८ सप्टेंबर ) टी -२० विश्वचषक स्पर्धेसाठी बैठक होणार आहे. ज्यामध्ये या मुद्द्यावर नक्कीच चर्चा होईल.(Bcci miffed at Ravi Shastri and Virat Kohli for attending Crowded event)
ही मालिका सुरू होण्यापूर्वी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी पत्र लिहून सर्वांना आवर्जून सांगितले होते की, कुठ्ल्याही गर्दी असलेल्या कार्यक्रमात जाऊ नका. तरीदेखील विराट कोहली आणि रवी शास्त्री यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली. एका अधिकाऱ्याने म्हटले की, “असे मुळीच नाही की, रवी शास्त्री कार्यक्रमाला गेले म्हणून आजारी पडले. संघातील खेळाडू हॉटेलमध्ये ज्या लिफ्टच्या वापर करतात, त्याच लिफ्टचा वापर सामान्य लोक ही करतात. परंतु बोर्डचे स्पष्ट मत आहे की, दोघंही कार्यक्रमाला जाणं टाळू शकले असते.”
महत्त्वाच्या बातम्या –
“तिरंगा देशाची शान”, राष्ट्रीय ध्वजाचा अपमान केल्याबद्दल गावसकरांनी भारतीय चाहत्यांना सुनावले
विजयाचा आनंद अन् जल्लोष! ड्रेसिंग रुममध्ये परतताना कशा होत्या भारतीय खेळाडूंच्या भावना, पाहा व्हिडिओ
पाकिस्तानी वंशाच्या ‘या’ यष्टीरक्षकावर आयसीसीची मोठी कारवाई, घातली ४ वर्षांची बंदी





