लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत संघात चौथा कसोटी सामना केनिंग्टन ओव्हल स्टेडियमवर पार पडला. अखेरच्या सत्रापर्यंत रंगतदार ठरलेल्या या सामन्यात भारताने १५७ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे.
भारतासाठी हा विजय ऐतिहासिक ठरला आहे. कारण भारतीय संघाने तब्बल ५० वर्षांनंतर ओव्हल स्टेडियमवर विजय मिळवण्याचा कारनामा केला. यापूर्वी १९७१ साली भारताने ओव्हल स्टेडियमवर विजय मिळवला होता. इतकेच नाही तर १९८६ नंतर पहिल्यांदाच भारताने इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेत २ सामने जिंकले आहेत.
त्यामुळे या ऐतिहासिक विजयाचा आनंद भारतीय खेळाडूंनी जोरदार साजरा केला आहे. बीसीसीआयने या सामन्यानंतर एक व्हिडिओ अधिकृत वेबसाईटमवर शेअर केला आहे. तसेच या व्हिडिओची छोटी झलक सोशल मीडियावरही शेअर केली आहे. या व्हिडिओमध्ये सामना संपल्यानंतर ड्रेसिंगरुममध्ये परतताना भारतीय खेळाडूंच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की ‘ओव्हलमधील भारताच्या शानदार विजयानंतर ड्रेसिंग रुममधील दृश्य आणि प्रतिक्रिया.’
या व्हिडिओमध्ये दिसते की भारतीय खेळाडूंचे ड्रेसिंग रुममध्येही जोरदार स्वागत झाले. तसेच भारताने सामना जिंकल्यानंतर संघातील सपोर्ट स्टाफ आणि इतर खेळाडूंनी केलेला जल्लोषही दिसत आहे. त्याचबरोबर भारताचा कर्णधार विराट कोहली ड्रेसिंगरुममध्ये मोहम्मद शमीसह मोठ्याने हसतानाही दिसत आहे.
तसेच या व्हिडिओमध्ये सामन्यानंतरची रोहित शर्मा, उमेश यादव आणि शार्दुल ठाकूर यांच्या प्रतिक्रिया देखील आहेत. या तिघांनीही भारताला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. या सामन्यात रोहितने दुसऱ्या डावात १२७ धावांची शतकी खेळी केली होती. तसेच उमेशने दोन्ही डावात मिळून ६ विकेट्स घेतल्या.
शार्दुलने दोन्ही डावात दोन अर्धशतके झळकावले. तसेच ३ विकेट्सही घेतल्या. मुख्य म्हणजे दुसऱ्या डावात इंग्लंडची शतकी सलामी दिलेली हसीब हमीत आणि रॉरी बर्न्स यांची जोडी शार्दुलनेच तोडली होती. तसेच त्याने इंग्लंडचा कर्णधार जो रुटचीबी विकेट घेतली होती, ज्यामुळे भारताने सामन्यात पुनरागमन केले होते.
या सामन्याबद्दल बोलताना रोहित म्हणाला, ‘आशा आहे की आता आम्ही मालिकाही जिंकू, पण त्यासाठी आम्हाला आत्तापर्यंत जशा गोष्टी केल्या, तशाच पुढेही कराव्या लागतील.’
याबरोबरच रोहितने शार्दुलचेही कौतुक केले. तो म्हणाला, ‘त्याची कामगिरी सामना जिंकवणारी होती. तो सामनावीर पुरस्कारासाठी पात्र होता. शेवटच्या दिवशी इंग्लंडने बिनबाद १०० केलेले असताना त्याने ब्रेकथ्रू मिळवून दिला. तसेच त्याने जो रुटचीही विकेट घेतली. त्याची फलंदाजीही आपण कशी विसरु शकतो. त्याने आक्रमक फलंदाजी ज्याप्रमाणे केली, ते खूप काही सांगून जातं. त्याला त्याची फलंदाजी आवडते आणि त्याने त्यावर खूप काम केले आहे. मी त्याला पूर्वीपासून खूप जवळून पाहिलं आहे. हो मला सामनावीर पुरस्कार मिळाला, पण मला वाटतं की त्याचाही यात सहभाग होता.’
त्याचबरोबर उमेश यादव म्हणाला की ‘आम्हाला माहित होते की खेळपट्टी सपाट आहे, त्यामुळे आम्हाला ५ व्या दिवशी खूप मेहनत करावी लागेल. आम्ही चांगल्या लेंथवर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला आणि धावा रोखण्याचा प्रयत्न केला. कारण आम्हाला माहित होते की विकेट नक्कीच मिळतील.’
तसेच शार्दुल म्हणाला, ‘खूप छान वाटत आहे. मला ज्यादिवशी कळालं की मी खेळणार आहे, तेव्हाच मी या सामन्यात चांगली कामगिरी करण्याचा विचार केला होता आणि मला माझी उपयुक्तता सिद्ध करायची होती.’
DO NOT MISS! ???? ????
From the dressing room, we get you unseen visuals & reactions post an epic win from #TeamIndia at The Oval ???? ???? – by @RajalArora
Watch the full feature ???? ???? #ENGvINDhttps://t.co/BTowg3h10m pic.twitter.com/x5IF83J4a0
— BCCI (@BCCI) September 7, 2021
या सामन्यात भारताने इंग्लंडसमोर ३६८ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंड संघ २१० धावांवरच सर्वबाद झाला. या विजयामुळे भारताने मालिकेतील पराभव टाळला असून आता अखेरचा सामना जिंकून किंवा अनिर्णित राखून मालिका जिंकण्याची संधी भारताकडे असणार आहे. तर इंग्लंडला मालिकेतील पराभव टाळायचा असेल तर अखेरचा सामना जिंकण्याव्यतिरिक्त दुसरा पर्याय नाही. अखेरचा सामना १० सप्टेंबरपासून मँचेस्टर येथे सुरु होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
पाकिस्तानी वंशाच्या ‘या’ यष्टीरक्षकावर आयसीसीची मोठी कारवाई, घातली ४ वर्षांची बंदी
बिग ब्रेकिंग! पाचव्या कसोटीसाठी इंग्लंडने घोषित केला संघ, बटलरचे पुनरागमन; ‘या’ फिरकीपटूचीही निवड





