भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान सध्या चार सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. मालिकेतील तिसरा दिवस-रात्र स्वरूपाचा कसोटी सामना भारतीय संघाने अवघ्या दोन दिवसात जिंकून मालिकेत २-१ अशी आघाडी मिळवली आहे. मात्र, तिसऱ्या कसोटीसाठी वापरण्यात आलेल्या खेळपट्टीवर अनेक आजी-माजी खेळाडूंनी टीका केल्यानंतर चौथ्या आणि अखेरच्या कसोटीसाठी फलंदाजीला पोषक खेळपट्टी बनविण्यात येईल, असे बीसीसीआयच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
भारतीय संघाने मिळवला दोन दिवसात विजय
अहमदाबाद येथील नव्याने पुनर्बांधणी केलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (पूर्वाश्रमीचे मोटेरा स्टेडियम) झालेल्या दिवस-रात्र कसोटीत भारतीय संघाने अवघ्या दोन दिवसात विजय संपादन केला. त्यानंतर, सामन्यातील खेळपट्टीवर अनेक माजी खेळाडूंनी टीका केली होती. तसेच इंग्लंड संघाचा कर्णधार जो रूटने देखील उघडपणे नाराजी व्यक्त करत, आयसीसीला याकडे गंभीरतेने पाहण्याची विनंती केली होती.
चौथ्या सामन्यासाठी असेल अशी खेळपट्टी
तिसऱ्या सामन्यात वापरण्यात आलेल्या खेळपट्टीवर टीका झाल्यानंतर बीसीसीआय सतर्क झाली आहे. चौथ्या सामन्यासाठी कशा प्रकारची खेळपट्टी असेल याविषयी बोलताना बीसीसीआयच्या सूत्राने म्हटले, “चौथ्या सामन्यातील खेळपट्टी ही फलंदाजांसाठी अनुकूल असेल. या खेळपट्टीवर चेंडू चांगली उसळी घेईल. ४ ते ८ मार्च दरम्यान होणारी ही कसोटी मोठ्या धावसंख्येसाठी आठवली जाईल. एक सुरेख कसोटी सामना आपल्याला पाहायला मिळेल.”
या अधिकाऱ्याने पुढे बोलताना म्हटले, “तिसऱ्या सामन्यासाठीची खेळपट्टी कशी होती याबाबतचा अहवाल सामनाधिकारी जवागल श्रीनाथ हे देतील. त्यानंतर आयसीसी खेळपट्टीला श्रेणी देईल. सध्या इंग्लंड संघातर्फे खेळपट्टीबाबत कोणतीही अधिकृत तक्रार करण्यात आली नाही.”
त्याच मैदानावर खेळवली जाणार शेवटची कसोटी
तिसरी दिवस-रात्र कसोटी ज्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला होता. त्याच मैदानावर मालिकेतील अखेरची कसोटी खेळवली जाईल. मात्र, ही कसोटी सकाळी सुरू होईल. या कसोटीसाठी भारतीय संघात बदल होणे निश्चित आहे. कारण, भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनी वैयक्तिक कारणास्तव या कसोटीतून माघार घेतली आहे. त्यामुळे, त्याच्या जागी मोहम्मद सिराज किंवा अनुभवी उमेश यादव यांना स्थान दिले जाऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या –
‘चांगली क्रिकेट खेळपट्टी म्हणजे काय? तिची व्याख्या काय?’, आर अश्विनने इंग्लिश पत्रकाराला फटकारले