---Advertisement---

टीम इंडियाचं वेळापत्रक गजबजलं! ऑक्टोबर महिन्यात मायदेशात होणार दोन टी२० मालिका

On: गुरूवार, मार्च 18, 2021 5:34 PM
---Advertisement---

येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात टी२० वर्ल्डकपचे आयोजन केले जाणार आहे. भारताने या वर्ल्डकपसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. याचाच भाग म्हणून सध्या भारत दौर्‍यावर असलेल्या इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ तब्बल पाच सामन्यांची टी२० मालिका खेळतो आहे. टी२० वर्ल्डकपपूर्वी तयारीसाठी भारताकडे ही शेवटची संधी आहे, असे जवळपास निश्चित होते.

मात्र आता यात बदल झाला आहे. टी२० वर्ल्डकपपूर्वी भारतीय संघ अजून दोन मालिका खेळण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडशी भारतीय संघ काही सामने खेळू शकतो.

भारताच्या दौर्‍यावर येणार संघ
वर्ल्डकपपूर्वी भारतीय संघाला पुरेसा सराव मिळावा, यासाठी या दोन मालिका आयोजित करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे समजते. अद्याप या मालिकांची कार्यक्रम पत्रिका निश्चित झाली नसली तरी या दोन्ही मालिका भारतातच खेळवल्या जाणार असल्याची माहिती आहे. भारतीय संघ २००७ साली पहिल्यावहिल्या टी२० वर्ल्डकपचा विजेता ठरला होता. मात्र त्यानंतर एकही विजेतेपद पटकावण्यात त्यांना यश आले नाही. त्यामुळे यंदा मायदेशात होणार्‍या वर्ल्डकपसाठी पूर्ण जोमाने तयारी करण्याचा बीसीसीआयचा मानस आहे.

याबाबत बोलताना बीसीसीआयचे एक वरिष्ठ अधिकारी म्हणाले, “ऑक्टोबर महिन्यात दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडचे संघ भारतात द्विपक्षीय टी२० मालिका खेळण्यासाठी येऊ शकतात. टी२० वर्ल्डकपपूर्वी या मालिका खेळवण्यात येतील. याबाबत दोन्ही देशांशी चर्चा अद्याप सुरू आहे. मात्र वर्ल्डकपपूर्वी भारतीय संघासाठी हे गरजेचे आहे, असे बोर्डाला वाटते. म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे.”

कोरोना काळातील नियमांचे आव्हान
दरम्यान, सध्याचे भारतीय संघाचे वेळापत्रक पाहिले तर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेनंतर टी२० वर्ल्डकपपर्यंत भारतीय संघ एकही टी२० मालिका खेळणार नाही. हे संघासाठी नुकसानकारक ठरण्याची शक्यता असल्यानेच बीसीसीआयने ऑक्टोबर महिन्यात दोन मालिका आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र कोरोना विषाणूचे सक्त नियम पाहता अतिशय कमी कालावधीत या मालिका कशा खेळवल्या जातील याबाबत साशंकता आहे. त्यामुळे बीसीसीआयच्या अंतिम निर्णयाकडे सगळ्यांचेच लक्ष लागून असेल.

महत्वाच्या बातम्या:

चौथ्या सामन्यात रोहित-चहल यांच्या निशाण्यावर असतील हे मोठे विक्रम

शेर कभी बुढ़ा नहीं होता! सचिनच्या त्या षटकाराने चाहत्यांना आली २००३ विश्वचषकाची आठवण, पाहा व्हिडिओ

त्याचा आम्हाला चेन्नईच्या मैदानावर फायदा होईल, मुंबई इंडियान्सच्या प्रशिक्षकाने केले कौतुक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---