भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) देशांतर्गत क्रिकेटपटूंवर पैशाचा वर्षाव करणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. या क्रिकेटपटूंचे वेतन दिवाळीपूर्वी वाढवले जाऊ शकते. २० सप्टेंबरला बीसीसीआय आपल्या वार्षिक बैठकीत देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या सामना शुल्कात सुमारे ४० टक्के वाढ करू शकते. बीसीसीआय राज्य क्रिकेट बोर्डांच्या सहकार्याने देशांतर्गत क्रिकेटपटूंना केंद्रीय करारात समाविष्ट करण्याबाबत विचार करत आहे.
खेळाडूंना मिळू शकते इतके वेतन
माध्यमांतील वृत्तानुसार, प्रथमश्रेणी आणि लिस्ट ए क्रिकेट खेळणाऱ्या क्रिकेटपटूंचे वेतन पन्नास हजार रुपयांपर्यंत वाढवले जाऊ शकते. तर, टी२० सामन्यांसाठी २५००० रुपये मिळू शकतात. आतापर्यंत खेळाडूंना रणजी ट्रॉफी व विजय हजारे ट्रॉफीतील प्रतिदिन ३५,००० रुपये मॅच फी म्हणून मिळतात. सय्यद मुश्ताक अली टी२० स्पर्धेत सहभागी खेळाडूंना प्रत्येक सामन्यासाठी १७,५०० रुपये मॅच फी मिळते. राखीव खेळाडूंना मॅच फीचे ५० टक्के वेतन मिळते.
रणजी ट्रॉफीच्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनचा भाग असणाऱ्या खेळाडूंना दररोज ३५,००० रुपये मिळतात. जर सामना चार दिवस चालला तर खेळाडू १ लाख ४० हजार रुपये कमवतात. राखीव खेळाडू देखील एका सामन्यातून ७० हजार रुपयांची कमाई करतात.
केंद्रीय करारावर होऊ शकतो निर्णय
बीसीसीआय अध्यक्ष झाल्यानंतर सौरव गांगुली यांनी २०१९ मध्ये केंद्रीय कराराची घोषणा केली होती. या बैठकीत त्यावरही निर्णय होऊ शकतो. दरम्यान, महिला क्रिकेटपटूही मॅच फी वाढीची अपेक्षा करत आहेत. सध्या महिला क्रिकेटपटूंना प्रति वनडे १२,५०० रुपये आणि टी२० साठी ६,२५० रुपये दिले जातात. महिला खेळाडूंच्या मॅच फीमध्ये २५ ते ४० टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर, कोरोनामुळे गेल्या हंगामात रणजी खेळू न शकलेल्या घरगुती क्रिकेटपटूंनाही मॅच फीची किमान ५० टक्के रक्कम भरपाई म्हणून मिळू शकते. त्याला बीसीसीआय या बैठकीत मंजुरी देऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल प्रेमींसाठी खूशखबर! मैदानात पुन्हा दिसणार प्रेक्षक, युएई सरकारने दिली परवानगी
द्रविड बनू शकतो टीम इंडियाचा प्रशिक्षक, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने दिले संकेत
Video: महाराष्ट्राच्या प्रत्येक फॅमिलीचा अभिमान म्हणत मुंबई इंडियन्सने सादर केले नवे मराठी थीम साँग