कोणत्याही क्रिकेट सामन्यात विरुद्ध संघातील फलंदाजांच्या समस्या वाढवण्यासाठी गोलंदाज सतत चेंडूवर लाळ लावत असतात. मात्र जानेवारी महिन्यापासून चालू होणाऱ्या भारतीय देशांतर्गत हंगामादरम्यान गोलंदाजांना ही गोष्ट टाळावी लागणार आहे. कोविड-१९ चा खेळाडूंना कसलाही त्रास होऊ नये म्हणून बीसीसीआयने नवे स्वास्थ आणि सुरक्षा प्रोटोकॉल जाहीर केले आहेत.
मध्य प्रदेश क्रिकेट संघाच्या एका अधिकाऱ्याने बुधवारी (३० डिसेंबर) याविषयी माहिती दिली आहे. त्यांच्या महितीनुसार, बीसीसीआयने सय्यद मुश्ताक अली स्पर्धेची सुरुवात होण्यापुर्वी सर्व सहभागी राज्य संघटनांना जवळपास ३० पानांचा प्रोटोकॉल पाठवला आहे. यामध्ये चेंडूवर लाळ न लावण्याच्या नियमाचा समावेश आहे. तसेच जर सराव सत्रात किंवा सामन्यामध्ये जैव सुरक्षित वातावरणाचा भाग नसणाऱ्या खेळाडूच्या हाती गोलंदाजी सोपवायची असेल. तर त्या खेळाडूला चेंडू देण्यापुर्वी सामना पंच किंवा संघाच्या कर्मचाऱ्यांनी चेंडू सॅनिटाईज करावा, या नव्या नियमाची भर घालण्यात आली आहे.
सामन्यांची ठिकाणे, हॉटेल्स, प्रशिक्षण स्थळे आणि प्रवासादरम्यान जैव सुरक्षित वातावरण बनवण्यात येणार आहे. सर्व संघातील खेळाडू, सहकारी कर्मचारी, सामना अधिकारी, सामन्याचे व्यवस्थापन करणारे समूह, समालोचक आणि इतर कर्मचारी यांच्यासाठी हे जैव सुरक्षित वातावरण तयार करण्यात येणार आहे.
बीसीसीआयने जाहीर केलेल्या प्रोटोकॉलनुसार, सर्व सहभागी खेळाडूंना संबंधित शहरात आल्यानंतर निर्धारित हॉटेलमध्ये सहा दिवसांसाठी सेल्फ क्वारंटाईनमध्ये ठेवले जाईल. दरम्यान पहिल्या, तिसऱ्या आणि सहाव्या दिवशी आरटी-पीसीआर पद्धतीने त्यांची कोविड-१९ चाचणी केली जाईल. या चाचणीमध्ये निगेटिव्ह आढळलेल्या खेळाडूंनाच जैव सुरक्षित वातावरणात प्रवेश मिळेल.
अत्यंत बिकट परिस्थिती ओढावल्यास खेळाडू किंवा सहकारी कर्मचाऱ्यांना जैव सुरक्षित वातावरणाच्या बाहेर जाण्याची मुभा असेल. परंतु त्यापुर्वी त्यांना संघाच्या डॉक्टरांची परवानगी घ्यावी लागेल. तसेच प्रोटोकॉलमध्ये हे देखील देण्यात आले आहे की, कोविड-१९ पासून वाचवण्यासाठी देण्यात आलेल्या दिशा-निर्देशांचे कुणी उल्लंघन केल्यास बीसीसीआयद्वारे त्या व्यक्तिला कठोर शिक्षा दिली जाईल.
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ खेळाडूच्या मते उर्वरित दोन सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाचा संघच विजयाचा दावेदार
तुझे वजन २०-२५ किलो जास्त आहे म्हणणाऱ्या वेडला रिषभ पंतचे जबरदस्त प्रत्युत्तर, म्हणाला..






