भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी मालिका खेळतो आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागलेल्या भारतीय संघाने मेलबर्नवरील दुसऱ्या कसोटी सामन्यात मात्र शानदार पुनरागमन केले. या बॉक्सिंग डे कसोटीत भारताने ८ गडी राखून ऑस्ट्रेलियावर मात करत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. त्यामुळे मालिकेत चुरस निर्माण झाली असून तिसरा सामना रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.
अशातच भारतीय संघासाठी आनंदाची बातमी आली आहे. दुखापतीमुळे संघाबाहेर असलेला भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्मा आता संघात परतला असून त्याने सरावाला प्रारंभ केला आहे. रोहित शर्मा सराव करत असतानाचा फोटो बीसीसीआयने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला. या फोटोंमध्ये रोहित क्षेत्ररक्षणाचा सराव करताना दिसतोय. बीसीसीआयने या फोटोला “इंजिन पळण्यासाठी तयार होते आहे. पुढे काय होणार, याची ही झलक आहे”, असे हटके कॅप्शनही दिले आहे.
https://twitter.com/BCCI/status/1344543505226452992
रोहित शर्माला आयपीएलमध्ये खेळताना मांडीचे स्नायू ताणल्या गेल्याने दुखापत झाली होती. त्यामुळे तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेला मुकला होता. तसेच पहिल्या दोन कसोटी सामन्यातही तो खेळू शकला नाही. दुखापतीतून सावरण्यासाठी रोहितने बेंगलोरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत घाम गाळला. ११ डिसेंबरला फिटनेस टेस्ट पास झाल्याने तो १४ तारखेला ऑस्ट्रेलियाला रवाना झाला होता. ऑस्ट्रेलियात आल्यावर त्याने १४ दिवसांचा विलागीकारणाचा कालावधी पूर्ण केला असून काल तो संघात सामील झाला.
मात्र दीर्घ विश्रांतीनंतर रोहित पुनरागमन करत असल्याने त्याच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील समावेशाबद्दल खात्रीलायक विधान करण्यास भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी नकार दिला होता. मात्र ७ जानेवारीपासून सिडनीत खेळवल्या जाणाऱ्या सामन्यात रोहितला संघात स्थान मिळेल, हे जवळपास पक्के मानले जाते आहे.
महत्वाच्या बातम्या:
– भारताला मोठा झटका! प्रमुख वेगवान गोलंदाज उमेश यादव कसोटी मालिकेतून बाहेर
– जागतिक कसोटी क्रमवारी: मेलबर्न कसोटीतील शतकाने रहाणेला फायदा, तर हा खेळाडू पोहोचला अव्वलस्थानी
– दहावी विकेट काढण्यासाठी विलियम्सनने अशी लढवली शक्कल, व्हिडिओ पाहून तुम्हीही कराल प्रशंसा