कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे यंदा भारतात जानेवारीनंतर कोणताच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला गेला नाही. यावर्षी आयपीएलचे आयोजन सुद्धा यूएईत करण्यात आले होते. आता तर असे अंदाज लावले जात आहेत की, भारत आणि इंग्लंड यांच्यात होणारी मालिकाही भारताबाहेर खेळवली जाईल. मात्र माध्यमाच्या माहितीनुसार दोन्ही क्रिकेट मंडळात याबद्दल चर्चा सुरू आहे आणि शक्यतो सर्व सामने भारतातच खेळविले जाण्यासाठी दोन्ही क्रिकेट मंडळं उत्सुक आहेत. भारतातील कोरोना रुग्णांची घटणारी संख्या पाहता भारतातच आयपीएलचे आयोजन करण्याचा बीसीसीआयचा मानस आहे.
भारतातच होणार आयपीएल सामने
काही शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत आहेत. त्यामुळे पुढील वर्षी आयपीएल सामने भारतातच होण्याची शक्यता आहे तसेच इंग्लंडचा भारत दौरा देखील इतरत्र हलविला जाणार नसल्याचे बोलले जात आहे. यापुर्वी तीन वेळा आयपीएलचे आयोजन परदेशात करण्यात आले होते. त्यात युएईमध्ये दोनदा व दक्षिण आफ्रिकेत एकदा हे आयोजन करण्यात आले होते.
दोन्ही क्रिकेट मंडळात चर्चा सुरू आहे
इंग्लंडचे बातमीपत्र डेली मेलच्या एका बातमीनुसार बीसीसीआय आणि ईसीबी यांच्यात सध्या चर्चा सुरू आहे. हे सामने नक्की कुठे घ्यायचे याबद्दल चर्चा सुरु आहे. भारत दौऱ्यावर येणारा इंग्लंड संघ 4 कसोटी, 3 वनडे आणि टी-20 सामने खेळणार आहे. बीसीसीआयच्या सूत्रांच्या माहितीनुसार, कोणत्यातरी एका शहरात संघाचा मुक्काम ठेवला जाणार आहे व मुक्कामाच्या ठिकाणच्या जवळच्या स्टेडियममध्ये सामने होवू शकतात.
असे असले तरीही बीसीसीआय मालिकेतील सर्व सामने वेगवेगळ्या शहरात आणि वेगवेगळ्या मैदानात खेळले जाण्यासाठी प्रयत्नशील आहे. या मालिकेतील ४ कसोटी सामन्यांपैकी एक सामना अहमदाबादच्या नवीन स्टेडियममध्ये खेळला जाणयाची दाट शक्यता आहे. कसोटी मालिकेला फेब्रुवारी महिन्यात सुरू होणार असून त्यानंतर वनडे आणि टी-20 मालिका मार्चमध्ये खेळली जाईल.
एक कसोटी सामना कमी करून दोन टी-20 सामने वाढवले
यापूर्वी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली म्हणाले होते की मालिकेत चार कसोटी सामने खेळले जातील. 2021 या वर्षात होत असलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेला लक्षात ठेवून एक कसोटी सामना कमी केला आहे. त्याबदल्यात अजून दोन टी-20 सामने वाढवले आहेत.