भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये लवकरच वनडे आणि कसोटी मालिकेचा थरार रंगणार आहे. १६ डिसेंबर रोजी भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होईल. या मालिकेत सुरुवातीला ३ कसोटी सामन्यांची मालिका पार पडणार आहे. त्यानंतर ३ वनडे सामन्यांची मालिका खेळवली जाईल. या मालिकांत रोहित शर्मा याला कसोटी संघाचे उपकर्णधारपद, तर वनडे संघाचे कर्णधारपद देऊ केले होते. मात्र, या निर्णयानंतर भारतीय क्रिकेटमध्ये एक वेगळाच वाद निर्माण झाला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) एक धक्कादायक निर्णय घेऊ शकते.
कर्णधारपदाचा वाद सुरू
रोहित शर्मा याच्याकडे वनडे संघाचे नेतृत्व दिल्याने विराट कोहली खुश नसल्याचे वृत्त माध्यमांमध्ये आहे. विराटने स्वेच्छेने टी२० संघाचे नेतृत्व सोडले होते. मात्र, वनडे व कसोटी संघाचे नेतृत्व तो करत होता. परंतु, बीसीसीआयने अचानक रोहित याला वनडे संघाचे कर्णधारपद देखील देऊ केले. यामुळे भारतीय क्रिकेटमध्ये विराट विरुद्ध रोहित असा अप्रत्यक्ष वाद सुरू झालेला दिसतो. विशेष म्हणजे दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या तोंडावर रोहित दुखापतग्रस्त होऊन कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. तर, विराटही वैयक्तिक कारणांमुळे वनडे मालिकेसाठी उपलब्ध असणार नाही अशी बातमी समोर येतेय.
बीसीसीआय काढणार तोडगा
रोहित आणि विराट यांच्यातील तथाकथित वाद मिटवण्यासाठी बीसीसीआय एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, या प्रकरणावर काही दिवसात तोडगा न निघाल्यास बीसीसीआय केएल राहुल याच्याकडे तिन्ही प्रकारच्या संघांचे नेतृत्व देऊ शकते. राहुल सध्या ३० वर्षाचा आहे. त्यामुळे पुढील पाच-सहा वर्ष तो संघाची धुरा वाहू शकतो. दुसरीकडे, विराट ३३ व रोहित ३४ वर्षांचा असल्याने वय त्यांच्या विरोधात जात आहे. तसेच, राहुल आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड हे कर्नाटकचेच असल्याने त्यांच्यातील संबंध मैत्रीपूर्ण आहेत. याचा फायदा भारतीय संघाला होऊ शकतो.
त्याचबरोबर बीसीसीआय तिन्ही प्रकारच्या क्रिकेटसाठी तीन वेगळे कर्णधार नेमू शकते. यामध्ये राहुलकडे कसोटी, श्रेयस अय्यर याच्याकडे वनडे व रिषभ पंतकडे टी२० संघाचे नेतृत्व दिले जाण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
प्रियांक पांचालच्या निवडीमूळे संतापला माजी खेळाडू; म्हणाला, “हा त्या खेळाडूवर अन्याय…”
भारतीय क्रिकेटमधील कलहाचे कारण आयपीएल? धक्कादायक माहिती आली समोर