भारतात लवकरच देशांकर्गत क्रिकेट स्पर्धांचा हंगाम सुरु होणार आहे. त्यामुळे आता सर्वच राज्य संघ तयारीला लागले असून पश्चिम बंगाल क्रिकेट असोसिशननेही (कॅब) काही दिवसांपूर्वीच प्रशिक्षकांची नियुक्ती केली होती. त्यानुसार भारताचा माजी क्रिकेटपटू आणि बंगालचा माजी कर्णधार लक्ष्मी रतन शुक्लाला २३ वर्षांखालील बंगाल संघाच्या प्रशिक्षकाची जबाबदारी देण्यात आली होती.
त्याने सोमवारपासून (२६ जुलै) ही जबाबदारी स्विकारली. ही जबाबदारी हातात घेताच त्याने काही कठोर नियम तयार केले आहेत. यात ‘सोशल मीडियापासून दूर रहाणे’,’लांब केस चालणार नाहीत’, अशा काही नियमांचा समावेश आहे.
शुक्लाने पीटीआयशी बोलताना सांगितले की ‘मी खेळाडूंना सांगितले आहे की सोशल मीडियावर काहीही पोस्ट करु नका. त्यांनी योग्य वर्तन आणि शिस्त राखली पाहिजे. फिटनेस कॅम्प चार तासांचा झाला. त्यात ६० क्रिकेटपटूंचा समावेश होता. त्यांना काही गटांमध्ये विभागण्यात आले होते, त्यानुसार त्यांचे गटानुसार ट्रेनिंग झाले.’
तो पुढे म्हणाला, ‘ज्यांनी केस वाढवले आहेत, त्यांना लवकरच सलूनमध्ये जावे लागणार आहे. तिसरी गोष्ट म्हणजे त्यांना संघात बॉन्डींग चांगले रहावे म्हणून बंगाली शिकावे लागेल.’
‘ज्यूनियर संघातून सिनियर संघात जाणारा मार्ग महत्त्वाचा असतो आणि त्याचमुळे मी ज्यूनियर क्रिकेटपटूंबरोबर काम करण्याची निवड केली. मला वेगवेगळ्या जिल्ह्यातून बरेच महिला आणि पुरुष क्रिकेटपटू आलेले पाहायचे आहेत. कॅब जिल्हास्तरीय स्पर्धा आणि क्लब स्पर्धांचाही खूप गांभीर्याने विचार करते, तसेच कॅब प्रगतीसाठी शक्य ते सर्व करत आहे.’
बंगालचा माजी क्रीडामंत्री असलेला शुक्ला म्हणाला, ‘आता आपल्याला जिल्ह्यांतील प्रतिभाशाली खेळाडूंना ओळखले पाहिजे, राज्यातील कानाकोपऱ्यातून येणाऱ्या युवा क्रिकेटपटूंवर बारीक लक्ष ठेवावे लागेल. मी सराव सत्रांदरम्यान हे सुनिश्चित करेल की खेळाडू मेहनत घेतील, त्यातून निकाल सर्वांसमोर येईलच. मी एक प्रशिक्षक नाही, मी मार्गदर्शक आहे, जो खेळाडूंना येथे मदत करेल. मला बंगाममधील अधिक खेळाडूंना राष्ट्रीय संघाकडून खेळताना पाहायचे आहे.’
शुक्ला भारताकडून ३ वनडे सामने खेळला आहे. त्याला भारताकडून अधिक सामने खेळण्याची संधी जरी मिळाली नसली, तरी त्याने बंगालकडून खेळताना आपली छाप पाडली. खेळाडू म्हणून निवृत्ती घेतल्यानंतर शुक्ला राजकारणाकडे वळाला. त्याने २०१६ ते २०२१ या काळात बंगालमधील युवा कल्याण व क्रीडा मंत्रालय सांभाळले होते. आता तो राजकारणातून पुन्हा क्रिकेट क्षेत्राकडे वळाला असून आता त्याने प्रशिक्षण क्षेत्रातही पाऊल टाकले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
टोकियो ऑलिंपिक: ‘असे’ आहे भारताचे ५ व्या दिवसाचे संपूर्ण वेळापत्रक; पाहा कोणते खेळाडू उरणार मैदानात
टोकियो ऑलिंपिकमध्ये रौप्य पदक जिंकणारी मीराबाई चानू परतली मायदेशी; दिल्लीत पोहचताच झाले जंगी स्वागत
मणिपूर सरकारने मिराबाई चानूला देऊ केली पोलिस खात्यात नोकरी, दिले ‘हे’ महत्त्वपूर्ण पद