-आदित्य गुंड (Twitter- @AdityaGund)
भारताने वेस्ट इंडिजचा पराभव करत १९८३ चा विश्वकरंडक जिंकला. या विश्वविजयाने भारतातील क्रिकेटला खरी चालना मिळाली असे अनेकजण मानतात. या विजयानंतरच अनेक शालेय मुले, महाविद्यालयीन तरुणांनी आपणही क्रिकेटकडे वळावे, आपणही कपिल, गावसकर व्हावे असे स्वप्न पाहिले. हा सामना संबंध भारतातील जनतेप्रमाणे मराठवाड्यातल्या एका घरी काही लोकांनीदेखील पाहिला. ह्यात एक ११ वर्षांचं पोरही होतं. हा सामना पाहून त्या पोरालाही आपण भारताकडून खेळावं असं वाटलं. खरोखर पुढे जाऊन तो भारताकडून कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट खेळला. भारताचा फलंदाजी प्रशिक्षकही बनला. होय, मी संजय बांगरबद्दलच बोलतोय.
संजयचा जन्म १९७२ सालचा. बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात भायाळा या छोट्या खेड्यातला. शिक्षणासाठी मात्र तो औरंगाबादला राहिला. औरंगाबादमध्ये असतानाच तो क्रिकेट खेळू लागला. त्यावेळी तो महाराष्ट्राच्या १५ वर्षाखालील संघाकडून एक सामनाही खेळला. मात्र औरंगाबादसारख्या ठिकाणी क्रिकेटच्या फारशा सोयी नसल्याने वयाच्या १५ व्या वर्षी संजयने मुंबई गाठली. तिथे तो क्लब क्रिकेट खेळू लागला. आधीच गुणवान खेळाडूंची श्रीमंती असलेल्या मुंबईत औरंगाबादहून आलेल्या संजयकडे कोणाचे लक्ष जाणार होते? त्याची स्पर्धा त्याचे समवयस्क असलेल्या तेंडुलकर, कांबळी आणि अशा अनेक गुणवान मुंबईकर खेळाडूंशी होती. क्लब पातळीवर भरपूर चांगली कामगिरी करूनही त्याला मुंबईकडून संधी मिळत नव्हती. एकीकडे वयही वाढत चालले होते. असे असताना संजयने रेल्वेकडून खेळायचे ठरवले आणि १९९३ च्या हंगामात रेल्वेकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
देशांतर्गत क्रिकेटच्या पहिल्या हंगामात संजयला रणजीच्या एकाच सामन्यात संधी मिळाली. या सामन्यात त्याने दोन्ही डावांत मिळून ६१ धावा केल्या. दुसऱ्या हंगामातही त्याची कामगिरी साधारणच राहिली. रणजी क्रिकेटचा १९९५-९६ चा हंगाम संजयच्या कारकिर्दीसाठी दिशादर्शक ठरला. या हंगामात खेळलेल्या ६ सामन्यांत मिळून त्याने २ शतके आणि १ अर्धशतकाच्या मदतीने ५२३ धावा काढल्या. गोलंदाजीतही त्याने ६ बळी मिळवले. या हंगामानंतर पुढची अनेक वर्षे संजय रेल्वेच्या संघाचा अविभाज्य घटक बनला. रेल्वेकडून खेळताना अनेकदा संजय फलंदाजी आणि गोलंदाजीची सुरुवात करत असे. रेल्वेने २००१-०२ मध्ये बडोद्याला नमवत आपले पहिले रणजी विजेतेपद मिळवले. या विजेतेपदात संजयने भरघोस योगदान दिले. त्या हंगामातल्या ५ सामन्यांत ६५ च्या सरासरीने त्याने ४५७ धावा काढल्या आणि १२ बळीदेखील मिळवले. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात तामिळनाडूच्या पहिल्या डावातील २७६ धावांना तोंड देताना रेल्वेची अवस्था ७ बाद २३७ अशी झाली. तामिळनाडूला पहिल्या डावात आघाडी मिळते की काय असे वाटत असताना संजयने मुरली कार्तिकच्या साथीने १८० धावांची भागीदारी करत रेल्वेला ४२३ पर्यंत नेत पहिल्या डावात आघाडी घेण्यास मदत केली.
इंग्लंड संघाच्या २००१ च्या भारत दौऱ्यात अध्यक्षीय संघाविरुद्ध त्यांनी सराव सामना खेळला होता. या सामन्यात संजयने दुसऱ्या डावात ५ बळी मिळवले. या सामन्यातली कामगिरी आणि देशांतर्गत स्पर्धांमध्ये सतत केलेली भरीव कामगिरी यांमुळे निवड समितीला संजयकडे फार काळ दुर्लक्ष करता आले नाही. अध्यक्षीय संघाकडून केलेल्या कामगिरीमुळे त्याचा इंग्लंडविरुद्धच्या कसोटी संघात समावेश करण्यात आला. रेल्वेकडून सलामीला फलंदाजी करणाऱ्या संजयला आपल्या पहिल्या कसोटीमध्येही सलामीला खेळण्याची इच्छा होती. तसे तो कर्णधार गांगुलीला बोललादेखील. मात्र गोलंदाज म्हणून या सामन्यात निवड झालेल्या संजयला आठव्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागली. या सामन्यात त्याने ३६ धावा केल्या. या मालिकेतल्या इतर दोन सामन्यांत संजय संघाबाहेर राहिला.
जानेवारी २००२ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतही संजयची भारतीय संघात निवड झाली. याच मालिकेत संजयबरोबर अजय रात्रा, मोहंमद कैफ, सरनदीप सिंग या खेळाडूंनीदेखील एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आपल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात संजयची कामगिरी ७षटकांत ४० धावा आणि १ बळी अशी ठीकठाकच राहिली.
या मालिकेनंतर लगेचच झालेल्या झिम्बाब्वेविरुद्धच्या कसोटी मालिकेत संजयने आपल्या दुसऱ्याच सामन्यात नाबाद शतक झळकावले. शिवसुंदर दास, तेंडुलकर आणि संजय या तिघांच्या शतकांच्या जोरावर भारताने ५७० धावांचा डोंगर उभारत झिंबाब्वेला डावाने हरवले.
त्याच वर्षी ऑगस्टमध्ये इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघात संजयचा समावेश केला गेला. इंग्लंड दौऱ्यातल्या तिसऱ्या कसोटीत संघात स्थान मिळालेल्या संजयने संधीचा पुरेपूर फायदा उठवला. या कसोटी सलामीला येत त्याने ६८ धावांची खेळी केली. मॅथ्यू होगार्ड, अँडी कॅडीक, फ्लिंटॉफ यांच्यासारख्या गोलंदाजांचा सामना करत त्याने द्रविडबरोबर १७० धावांची भागीदारी केली. संजयच्या या खेळीने द्रविड, तेंडुलकर आणि गांगुली या तिघांच्या त्या सामन्यातल्या शतकांचा पाया घातला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पहिल्या डावातल्या ६२८ धावांच्या जोरावर भारताने हा सामना डावाने जिंकला. संजयची ही खेळी त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी मानली जाते.
त्यानंतर ऑक्टोबर २००२ मध्ये भारत दौऱ्यावर आलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत संजयने २ अर्धशतके काढत चांगली कामगिरी केली. या मालिकेनंतर झालेल्या न्यूझीलंड दौऱ्यात मात्र संजयची कामगिरी खालावली आणि त्याला संघातून डच्चू मिळाला. केवळ एका दौऱ्यातल्या अपयशामुळे संजयला संघातून बाहेर ठेवणे अनेकांना पटले नाही. हा दौरा संजयच्या कसोटी कारकिर्दीचा शेवट ठरला. भारताकडून खेळलेल्या १२ कसोटी सामन्यांमध्ये संजयने ४७० धावा केल्या आणि ७ बळी मिळवले. वरकरणी पाहता हे आकडे फारसे बोलके नसले तरी त्या त्या प्रसंगी भारतासाठी संजयचे योगदान मोलाचे ठरले. संजय संघात असताना भारताने परदेशात दोन मोठे विजय मिळवले. तसेच त्याच्या कारकिर्दीतला शेवटचे दोन सामने सोडले तर भारताने इतर सगळे सामने जिंकले. या कारणासाठी त्याला भारतीय संघाचा लकी मॅस्कॉट म्हटले जाते.
संजयची एकदिवसीय कारकीर्द १५ सामन्यांची राहिली. वेस्ट इंडिजविरुद्ध ४१ चेंडूत ५७ धावांची नाबाद खेळी करत त्याने आणि द्रविडने (नाबाद १०९) भारताला विजय मिळवून दिला. आपल्या एकदिवसीय कारकिर्दीत संजयने १५ सामन्यांत १८० धावा केल्या आणि ७ बळी मिळवले. दक्षिण आफ्रिकेत २००३ साली झालेल्या विश्वकरंडकासाठी संजयचा भारतीय संघात समावेश करण्यात आला. मात्र एकही सामना न खेळता तो भारतात परतला.
भारताकडून संधी मिळत नसली तरी संजय देशांतर्गत क्रिकेट खेळत राहिला. त्याच्या नेतृत्वाखाली रेल्वेने २००४-०५ चा रणजी करंडक जिंकला. या हंगामात संजयने ९ सामन्यांत ४३७ धावा केल्या आणि ११ बळी मिळवत कर्णधाराला साजेशी अशी कामगिरी केली. या विजेतेपदानंतरही संजय सात आठ वर्षे खेळत राहिला. जवळपास २० वर्षांच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत संजयने १६५ सामन्यांत ८३४९ धावा केल्या आणि ३०० बळी मिळवले. रणजी स्पर्धेत ६००० धावा आणि २०० बळी अशी कामगिरी करणारे आजवर फक्त दोन खेळाडू आहेत. पहिले विजय हजारे आणि दुसरा संजय बांगर.
आयपीएलमध्ये संजयने खेळाडू म्हणून त्याची कारकीर्द सुरु केली. डेक्कन चार्जर्स, कोलकता नाईट रायडर्स असा त्याचा खेळाडू म्हणून प्रवास झाला. आयपीएलमध्ये त्याला फारसा प्रभाव पाडता आला नाही. त्याच दरम्यान त्याने प्रशिक्षक म्हणूनही काम सुरु केले. आयपीएलमधील संघ कोची टस्कर्स बरोबर त्याने फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम केले. भारत अ संघाचा प्रशिक्षक म्हणूनही त्याने काम पाहिले. किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने २०१४ मध्ये संजयला सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले. त्याच हंगामात त्याला मुख्य प्रशिक्षक म्हणून बढतीही मिळाली. त्याच्या मार्गदर्शनाखाली किंग्ज इलेव्हनने त्या हंगामात
आयपीएलची अंतिम फेरी गाठली. प्रशिक्षक म्हणून संजयची कामगिरी पाहून ऑगस्ट २०१४ मध्ये भारतीय संघाच्या फलंदाजीच्या प्रशिक्षकपदी त्याची नियुक्ती करण्यात आली. तेव्हापासून ते आजतागायत संजय भारतीय संघाचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम करतोय. भारताच्या फलंदाजांची गेल्या ३-४ वर्षातली कामगिरी पाहता संजयचे कौतुक केलेच पाहिजे. अगदी विराट कोहलीनेसुद्धा वेळोवेळी यासाठी संजयचे धन्यवाद मानले आहेत.
खेळाडू म्हणून फारशी प्रभावी नसली तरी प्रशिक्षक म्हणून संजयची कामगिरी खरोखर कौतुकास पात्र आहे. संजयच्या पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा.
संजय बांगरची क्रिकेट कारकीर्द
एकदिवसीय
सामने- १५, बळी- ७, धावा- १८०
कसोटी
सामने- १२, बळी- ७, धावा- ४७०
प्रथम श्रेणी
सामने- १६५, बळी- ३००, धावा- ८३४९






