आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धा यावर्षी १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान खेळवली जाणार आहे. ही स्पर्धा ओमान आणि संयुक्त अरब अमिराती येथे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) आयोजित केली जाईल. खरंतर ही स्पर्धा भारतात होणार होती, मात्र कोरोनाच्या संकटामुळे स्पर्धा ओमान आणि युएईमध्ये हलवण्यात आली. या स्पर्धेसाठी १६ जुलै रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) गटवारी जाहीर केली आहे.
आयसीसीने जाहीर केलेल्या गटवारीनुसार भारत आणि पाकिस्तान हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी सुपर १२ फेरीसाठी एकाच गटात आहेत. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना भारत आणि पाकिस्तान या हाय-व्होल्टेज सामना पाहाण्याची पुन्हा एकदा संधी मिळणार आहे. दरम्यान, या सामना होणार असल्याचे कळताच क्रिकेट जगतात बरीच चर्चा सुरु आहे. तसेच चाहत्यांमध्येही उत्साह पाहायला मिळत आहे. या सामन्याबद्दल आता भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारनेही प्रतिक्रिया दिली आहे.
वेळ आल्यावर विचार करु
भुवनेश्वर कुमार सध्या भारताच्या मर्यादीत षटकांच्या संघासह श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात त्याच्याकडे वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचे उपकर्णधारपद देण्यात आले आहे. या दौऱ्यातील सामन्यांना १८ जुलैपासून सुरुवात होत आहे. तत्पूर्वी, भुवनेश्वरने वर्च्यूएल पत्रकार परिषदेत अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी त्याला टी२० विश्वचषक २०२१ मध्ये होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याबद्दलही विचारण्यात आले.
याबद्दल भुवनेश्वर कुमार म्हणाला, ‘हे पाहा, पाकिस्तानविरुद्ध खेळणे हे नेहमीच उत्साहवर्धक असते. हा सामना नेहमीच दबावाचा असल्याने तो नेहमीच उच्चप्रतीच्या भावना उफळवणारा असतो. पण, प्रामाणिकपणे सांगायचं तर, आम्ही याबद्दल विचार केलेला नाही की हा सामना कसा होईल. कारण अजून बरेच क्रिकेट खेळायचे आहे. आम्हाला श्रीलंकेत सामने खेळायचे आहेत. तसेच इंग्लंडमध्ये कसोटी मालिकाही होणार आहे. त्यानंतर आयपीएल होईल आणि मग विश्वचषक होणार आहे. पण, नक्कीच आयपीएल संपल्यानंतर आम्ही या विश्वचषकाबद्दल विचार करू.’
भारत-पाकिस्तान एकाच गटात
या टी२० विश्वचषकात संघ क्रमवारीत अव्वल ८ स्थानांवर असलेले संघ थेट सुपर १२ च्या फेरीत खेळतील. तर अन्य ८ संघांमध्ये पहिली फेरी पार पडेल. त्यातील ४ संघ (प्रत्येक गटातील अव्वल २ संघ) सुपर १२ फेरीसाठी पात्र ठरतील. या फेरीत १२ संघांची २ गटात विभागणी होईल. म्हणजे प्रत्येक गटात ६ संघ असतील.
आयसीसीने जाहीर केलेल्या गटवारीनुसार सुपर १२ फेरीसाठी गतविजेते वेस्ट इंडिज, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांचा पहिल्या गटात समावेश आहे. या गटात पहिल्या फेरीतून पात्र ठरणारे २ संघ सामील होतील. तसेच सुपर १२ फेरीच्या दुसऱ्या गटात भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान या संघांचा समावेश आहे. तसेच या गटातही पहिल्या फेरीतून पात्र ठरणारे २ संघ सामील होतील.
भारत आणि पाकिस्तान एकाच गटात असल्याने टी२० विश्वचषकाच्या इतिहासात हे दोन संघ एकूण सहाव्यांदा एकमेकांसमोर येतील. यापूर्वी झालेल्या ५ सामन्यांपैकी ४ सामने भारताने जिंकले आहेत. तर, १ सामना २००७ च्या टी२० विश्वचषकावेळी बरोबरीत सुटला होता. त्यावेळी त्या सामन्याचा निकाल बॉल आऊटमध्ये लागला होता.
टी२० विश्वचषक २०२१ मधील पहिल्या फेरीत खेळणाऱ्या ८ संघांमध्ये बांगलादेश, श्रीलंका, आयर्लंड, नेदरलंड्स, स्कॉटलंड, नामीबिया, ओमान आणि पापुआ न्यू गिनी या देशांचा समावेश आहे.
या विश्वचषकातील सामने दुबई, अबुधाबी, शारजाह आणि ओमान येथे पार पडणार आहेत.
टी२० विश्वचषकासाठी संघांची गटवारी
पहिली फेरी
गट अ – श्रीलंका, आयर्लंड, नामीबिया आणि नेदरलंड्स
गट ब – ओमान, बांगलादेश, स्कॉटलंड आणि पापुआ न्यू गिनी
सुपर १२ फेरी
पहिला गट – वेस्ट इंडिज, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका, गट अ मधील अव्वल क्रमांकाचा संघ आणि गट ब मधील दुसऱ्या क्रमांकाचा संघ
दुसरा गट – भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, गट अ मधील दुसऱ्या क्रमांकाचा संघ आणि गट ब मधील अव्वल क्रमांकाचा संघ
महत्त्वाच्या बातम्या –
‘हा फिलंच वेगळा’, सरावाला सुरुवात करताना हिटमॅनने केली भावनिक पोस्ट
‘मुंबईकर’ सूर्यकुमार यादव करणार वनडे पदार्पण! स्वतः कर्णधाराने केली पुष्टी






