टी20 वर्ल्ड कप 2026 साठी टीम इंडियाच्या स्क्वाडची अधिकृत घोषणा झाल्यानंतर आगामी मेगा इव्हेंटमध्ये भारतासाठी टायटल डिफेंड करण्याची जबाबदारी कोणत्या 15 खेळाडूंवर असणार आहे, हे स्पष्ट झाले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) जाहीर केलेल्या या संघात मोठे बदल पाहायला मिळाले असून, सूर्यकुमार यादवकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. तर अक्षर पटेलची उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
या निवडीत सर्वात मोठा धक्का म्हणजे शुबमन गिलचा संघात समावेश न होणे. उत्कृष्ट फॉर्म असूनही गिलला वर्ल्ड कप स्क्वाडबाहेर ठेवण्यात आल्याने क्रिकेटविश्वात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दुसरीकडे, गेल्या दोन वर्षांपासून टी20 संघाबाहेर असलेला ईशान किशन पुन्हा एकदा टीम इंडियात परतला आहे. त्यामुळे विकेटकीपर-बॅटर म्हणून त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा असतील.
विशेष म्हणजे 2024 मध्ये भारताने टी20 वर्ल्ड कप जिंकलेल्या विनिंग स्क्वाडमधील तब्बल 7 खेळाडू यावेळी संघाचा भाग नाहीत. 2024 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने वर्ल्ड कप जिंकला होता. मात्र त्या विजयी संघातील रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. याशिवाय रिषभ पंत, मोहम्मद सिराज, यशस्वी जायसवाल आणि युझवेंद्र चहल यांना यंदा 2026 च्या स्क्वाडमध्ये स्थान मिळालेले नाही.
2024 च्या टी20 वर्ल्ड कपमधील भारतीय संघात रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल, रिषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांचा समावेश होता.
हार्दिक पांड्या, जो 2024 मध्ये उपकर्णधार होता, तो यावेळी केवळ खेळाडू म्हणून मैदानात उतरणार आहे. त्याच्या जागी अक्षर पटेलकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. 2026 च्या स्क्वाडमध्ये एकूण 5 ऑलराउंडर खेळाडूंचा समावेश असून, त्यातील तीन स्पिन ऑलराउंडर आहेत. गोलंदाजी विभागात कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती यांच्यावर विशेष जबाबदारी असणार आहे.
टी20 वर्ल्ड कप 2026 साठी भारताचा संघ- सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल (उपकर्णधार), जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, वॉशिंग्टन सुंदर आणि ईशान किशन.






