भारतीय संघाला आशिया कप (Asia Cup 2025) जिंकून साधारण तीन आठवडे होऊन गेले आहेत. अंतिम सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानला 5 गडी राखून हरवत नवव्यांदा आशिया कप जिंकला होता. पण अजूनही टीम इंडियाच्या हातात ट्रॉफी आलेली नाही. कारण असं की, फायनल सामन्यानंतर एसीसी (ACC) आणि पीसीबी (PCB) चेअरमन मोहसिन नक्वी (Mohsin Naqvi) ट्रॉफी घेऊन निघून गेले होते.
रिपोर्टनुसार, आशिया कपची ट्रॉफी सध्या दुबईतील एसीसीच्या ऑफिसमध्ये ठेवलेली आहे. पण भारताला ही ट्रॉफी नेमकी कधी मिळेल याबाबत अजूनही काही स्पष्ट सांगता येत नाही.
30 सप्टेंबरला दुबईत एसीसीची बैठक झाली होती. त्यात ठरवण्यात आलं की, कसोटी खेळणाऱ्या आशियाई पाच देशांचे क्रिकेट बोर्ड (भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान) मिळून या ट्रॉफीच्या वादावर तोडगा काढतील. ही बैठक पुढच्या महिन्याच्या सुरुवातीला होणार आहे, त्याच वेळी आयसीसीची (ICC) बैठकही आहे.
जर मोहसिन नकवी या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत, तर हा वाद आणखी चिघळू शकतो. याआधीही जुलैमध्ये झालेल्या आयसीसीच्या वार्षिक परिषदेला त्यांनी हजेरी लावली नव्हती. त्यामुळे या वेळीही ते स्वतः येण्याऐवजी कोणाला प्रतिनिधी म्हणून पाठवतील अशी चर्चा आहे.
रिपोर्ट्सनुसार, एका बीसीसीआय अधिकाऱ्याने सांगितले की अजून बैठकीसाठी वेळ आहे, त्यामुळे या काळात बोर्ड आपली पुढची भूमिका ठरवेल. अलीकडेच एसीसी चेअरमन मोहसिन नक्वींनी आदेश दिला होता की, त्यांच्या परवानगीशिवाय कोणालाही टीम इंडिया किंवा बीसीसीआयला ही ट्रॉफी देता येणार नाही.






