तारीख होती २६ ऑगस्ट २०१२. ऑस्ट्रेलियातील टाऊन्सविले येथे १९ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामना खेळला जात होता. यजमान ऑस्ट्रेलियाने कर्णधार विल्यम बोसिस्टोच्या नाबाद ८७ धावांच्या जोरावर निर्धारित ५० षटकात २२५ धावा फटकावल्या. संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट गोलंदाजी करणाऱ्या संदीप शर्माने या महत्त्वपूर्ण सामन्यात देखील चार बळी आपल्या नावे केले.
भारतीय संघाकडे या धावांचा पाठलाग करून चार वर्षानंतर पुन्हा एकदा विश्वविजेते होण्याची संधी होती. प्रशांत चोप्रा खातेही न खोलता माघारी परतला. बाबा अपराजितने ३३ धावा केल्या. मात्र, हनुमा विहारी व विजय झोल हे महत्त्वपूर्ण फलंदाज एक आकडी धावसंख्येच्या पुढे जाऊ शकले नाहीत. भारताची अवस्था २४.२ षटकात ४ बाद ९७ अशी झाली होती. आता प्रमुख अडचण अशी होती की, भारताकडे यष्टीरक्षक स्मित पटेल आणि अक्षदीप नाथ हे दोन फलंदाज शिल्लक होते. साऱ्या स्पर्धेत या दोघांना फलंदाजी करण्याची केतकी संधी मिळाली नव्हती. त्यामुळे, आता सामन्यात काय होणार? याकडे तमाम क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले होते.
तो सामना पाहत असणाऱ्या चाहत्यांना विश्वचषक गेला असे वाटत असताना, संघ व्यवस्थापन आणि मैदानावर उभा असलेला भारतीय कर्णधार यांच्यावर कसलेही दडपण नव्हते. आधीच अर्धशतकाच्या नजीक असलेल्या भारतीय कर्णधाराने स्मित पटेलला साथीला घेतले. अगदी धैर्याने त्यावेळी ऑस्ट्रेलिया संघाचा भाग असलेल्या जोएल पॅरिस, मार्क स्टेकटी, गुरविंदर संधू या गोलंदाजांचा त्यांनी सामना केला.
‘थेंबे थेंबे तळे साचे’ या म्हणीप्रमाणे त्यांनी धावा जुळवणे सुरु ठेवले. भारतीय कर्णधार अतिशय आक्रमकपणे आपली खेळी पुढे नेत होता. स्मितदेखील त्याला योग्य साथ देत, भारतीय संघाला तिसऱ्या विश्वविजयाकडे घेऊन चाललेला. कर्णधाराने दमदार शतक पूर्ण करत भारताच्या विजयाची औपचारिकता ठेवली. स्मितने एश्टन टर्नरच्या गोलंदाजीवर चौकार मारत भारताला चार वर्षानंतर पुन्हा एकदा विजेतेपद मिळवून दिले.
भारताच्या विजयाचा खरा नायक होता कर्णधार उन्मुक्त चंद. ‘कॅप्टन लीड फ्रॉम फ्रंट’ या उक्तीप्रमाणे त्याने सलामीला येत अखेरपर्यंत नाबाद राहून १११ धावांचे अप्रतिम खेळी केली. मोहम्मद कैफ व विराट कोहली त्यानंतर भारताला १९ वर्षाखालील मुलांचा विश्वचषक जिंकून देणारा तो केवळ तिसरा कर्णधार बनला.
कमी वयात मिळवली अफाट लोकप्रियता
युवा विश्वचषक जिंकल्यानंतर जिकडे-तिकडे उन्मुक्तच्या नावाचा डंका वाजू लागला. अनेकांनी त्यांची विराटसोबत तुलना करायला सुरुवात केली. खडूस ऑस्ट्रेलियन इयान चॅपेलने ‘भारताचा भविष्यातील सर्वात मोठा खेळाडू’ असे म्हणत त्याची स्तुती केली. काही दिवसातच तो भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंसोबत जाहिरातींमध्ये चमकू लागला. भारताच्या अ संघाचे नेतृत्वदेखील त्याच्याकडे दिले गेले. तो लवकरच भारतीय संघात खेळणार असे सर्वांना वाटू लागले. मात्र, इच्छा असलेले सर्वकाही पदरात पडते असे नाही ना? नेमके हेच उन्मुक्तसोबत घडले.
अपयशाच्या साडेसातीला झाली सुरुवात
सन २०१३ आयपीएलच्या उद्घाटन सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्ससाठी खेळताना त्याने हंगामातील पहिल्या चेंडूचा सामना केला. त्याच्यासमोर होता ऑस्ट्रेलियाचा दिग्गज ब्रेट ली. लीने पहिला चेंडू असा काही वेगात टाकला की, उन्मुक्तच्या दांड्या गुल झाल्या. खऱ्या अर्थाने त्याच्या वाईट वेळेची सुरुवात इथूनच झाली. पूर्ण हंगामात सात सामने खेळून तो केवळ ६१ धावा बनवू शकला. पुढील हंगामात राजस्थान रॉयल्सने आणि त्यानंतरच्या दोन हंगामात त्याला मुंबई इंडियन्सने आपल्या संघात सामील करून घेतले. परंतु, तो नेहमी बाकावरच बसून राहिला. याच दरम्यान त्याच्याकडून इंडिया ए संघाचे कर्णधारपद काढून घेण्यात आले.
समालोचक म्हणून करावे लागले काम
उन्मुक्तच्या आयुष्यात आणखी वाईट दिवस तर यायचे अजुन बाकी होते. २०१७ मध्ये त्याला दिल्लीच्या रणजी संघातून वगळले गेले. आयपीएलमध्ये देखील कोणी भाव दिला नाही. तो पूर्णता खचला. वर्षभर क्रिकेटपासून तो दूर राहिला. २०१९ मध्ये त्याने आपले मूळ राज्य असलेल्या उत्तराखंडकडून खेळताना पुनरागमन केले. त्याठिकाणी देखील त्याच्या हाती अपयशच आले. इतकेच काय तर २०२० च्या १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकावेळी तो चक्क समालोचन करताना दिसला. कॅरेबियन प्रीमियर लीगच्या समालोचकांमध्ये देखील त्याचा समावेश होता. क्रिकेटपटू ते समालोचक या प्रवासादरम्यान तो लेखकसुद्धा बनला होता. २०१३ मध्ये ‘स्काय इज द लिमिट’ या त्याने लिहिलेल्या पुस्तकासाठी वेस्ट इंडीजचे दिग्गज विवियन रिचर्ड्स यांनी प्रस्तावना लिहिली होती. तर, मुखपृष्ठावर विराट कोहलीने त्याच्या केलेल्या कौतुकाचे शब्द आहेत.
उन्मुक्त भारतासाठी का खेळला नाही? हा प्रश्न प्रत्येक क्रिकेटप्रेमी व जाणकारांना नेहमी सतावत असतो. कारण, त्याने ज्या झोकात आपल्या स्टाइलिश फलंदाजीने चाहते निर्माण केले होते.त्यावरून तो जास्तीत जास्त दोन वर्षात भारतीय संघाची डोक्यावर चढवेल असे वाटत होते. मात्र, भारतीय संघातील सुरस हे तो भारतीय संघासाठी न खेळण्याचे महत्त्वाचे कारण ठरले. तो ज्यावेळी फॉर्ममध्ये होता त्यावेळी, वीरेंद्र सेहवाग व गौतम गंभीर ही दिल्लीकर जोडी भारतासाठी सलामीला येत. त्यानंतर ही जागा रोहित शर्मा व शिखर धवन यांनी पटकावली आणि आजतागायत आपल्या नावे ठेवली. मधल्या काळात धवन थोडाफार मागे पडू लागला तेव्हा उन्मुक्त क्रिकेटच्या मुख्य प्रवाहापासून दूर जाऊ लागला होता. सध्या त्याने भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून अमेरिकेत तो कारकिर्द घडवण्याचा प्रयत्न करत आहे.
अगदी कमी वयात अफाट लोकप्रियता मिळवल्यानंतर, चाहत्यांच्या अपेक्षांचे ओझे वाढल्यानंतर त्या दबावाखाली उन्मुक्त अक्षरशः चेपला गेला. आता तो पुढील कारकिर्द कशी घडवतो हे पाहावे लागेल. परंतु, कमी वयात मिळालेले यश चिरकाल राहत नाही, याचे उत्तम उदाहरण उन्मुक्तमुळे सार्या युवा क्रिकेटपटूंना मिळाले.
महत्त्वाच्या बातम्या –
वाढदिवस विशेष: भारतीय क्रिकेटचा ‘दबंग’ क्रिकेटपटू ‘केदार जाधव’
केकेआरच्या ‘मॅच विनर’ वेंकटेशला WWE रेसलरकडून आयपीएलसाठी खास संदेश, पाहा काय म्हणाला?