आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंड एक असा देश राहिला आहे, ज्या देशाच्या क्रिकेटपटूंना कायमच ‘सार्वकालीन महान’ या श्रेणीपासून काहीसे अलिप्त ठेवले गेले. काही मोजके क्रिकेटपटू सोडले तर, न्यूझीलंडच्या खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर हवा तेवढा प्रभाव पडला नाही. सर रिचर्ड हॅडली, मार्टिन क्रो, डॅनियल व्हिटोरी व ब्रेंडन मॅक्युलम हे असे काही न्यूझीलंडचे माजी खेळाडू राहिले त्यांना आजही क्रिकेटजगतात मानाचे स्थान आहे.
सध्याच्या वर्तमान न्यूझीलंड संघातील केन विलयम्सन, टीम साऊदी व ट्रेंट बोल्ट या खेळाडूंची सातत्याने चर्चा होत असते. मात्र, या संघात दिग्गज म्हणून खऱ्या अर्थाने जो वरिष्ठ खेळाडू वावरतो तो म्हणजे मधल्या फळीतील फलंदाज रॉस टेलर (Ross Taylor). तो रॉस टेलर आज (८ मार्च) ३८ वर्षाचा होतोय.
हॉकीपटू ते क्रिकेटपटू
रॉसचा जन्म न्यूझीलंडमधील वेलिंग्टन शहरातला. त्याची आई सामोआ तर वडील न्यूझीलंड वंशाचे. शाळेच्या वयापासून रॉसला हॉकीची प्रचंड आवड होती. त्याने हॉकीमध्ये कारकीर्द करण्याचे नक्की देखील केलेले. मात्र, नंतर तो क्रिकेटकडे वळाला. रॉसचे पूर्ण नाव लुटेरू रॉस पोटोआ लोटे टेलर. इतके मोठे नाव कसे लिहायचे म्हणून त्याने आपल्या पहिल्या प्रथमश्रेणी सामन्यावेळी ‘रॉस टेलर’ असे संक्षिप्त नाव लिहिले.
शालेय क्रिकेटमध्ये चांगले नाव कमावल्यानंतर टेलरचा न्यूझीलंडच्या एकोणीस वर्षाखालील क्रिकेट संघात समावेश केला गेला. लवकरच त्याला त्या संघाचे कर्णधारपद देखील देण्यात आले. कर्णधार म्हणून त्याला संमिश्र यश लाभले होते. २००३-२००४ मध्ये त्याला पहिला प्रथमश्रेणी सामना खेळण्याची संधी मिळाली.
आंतरराष्ट्रीय कारकीर्द
रॉसने २००६ मध्ये वेस्ट इंडिज विरुद्धच्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्याचबरोबर, सामोआ वंशाचा केवळ दुसरा क्रिकेटपटू होण्याचा मान त्याला मिळाला. रॉस सुरुवातीपासूनच एक आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जात होता. हॉकीमधील कौशल्यांमुळे तो अतिशय सुरेखरित्या स्लॉग स्वीप मारत. त्याने कारकिर्दीच्या सुरुवातीला अत्यंत सातत्याने धावा काढत संघातील आपली जागा कायम ठेवली. न्यूझीलंड संघामध्ये केन विलयम्सनचे आगमन होईपर्यंत तिसऱ्या क्रमांकाची जबाबदारी त्याने यशस्वीरीत्या सांभाळली.
रॉसकडे २०१० मध्ये न्यूझीलंडच्या संघाचे कर्णधारपद देण्यात आले. २०११ च्या वनडे विश्वचषकात पाकिस्तान विरुद्ध खेळलेली नाबाद १३१ धावांची खेळी विश्वचषकातील सर्वोत्तम खेळ्यांपैकी एक मानली जाते.
आयपीएलचा सुपरस्टार ते सुपरफ्लॉप
रॉसची जगातील सर्वात श्रीमंत व्यवसायिक क्रिकेट लीग असलेल्या आयपीएलच्या सुरुवातीच्या हंगामांमध्ये चांगलीच चर्चा होती. २००८ आयपीएलवेळी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने त्याला आपल्या संघात सामील केले. मात्र, त्याला खरी ओळख मिळाली ती दुसऱ्या आयपीएल हंगामात कोलकत्ता नाइट रायडर्स विरुद्ध केलेल्या ३३ चेंडूतील नाबाद ८१ धावांच्या खेळीमुळे. पुढे, २०११ आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सने ४.६० कोटी रुपये देत आपल्या ताफ्यात घेतले. तो या हंगामात काहीसा अपयशी ठरला तरी पुढील हंगामासाठी दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचा भाग बनला. सातत्याने आयपीएलमध्ये अपयशी झाल्याने, २०१३ आयपीएलमध्ये पुणे वॉरियर्स इंडिया संघातून खेळल्यानंतर तो पुन्हा आयपीएलमध्ये दिसला नाही.
मार्टिन क्रो यांनी बदलले आयुष्य
रॉस टेलरला अगदी सुरुवातीच्या काळापासून न्यूझीलंडचे माजी कर्णधार राहिलेल्या मार्टिन क्रो यांनी मदत केली होती. त्याच्या, खेळात सुधारणा देखील त्यांनीच घडवून आणली. क्रो यांच्या निधनानंतर तो खूप भावूक झाला होता. त्याने एका मुलाखतीत सांगितले होते,
“मी देशाकडून एक कसोटी सामना खेळूनही खुश होतो. २०१२-२०१३ दरम्यान एक वेळ अशी आली होती की, मी क्रिकेट सोडण्याचा विचार केलेला. त्यावेळी क्रो यांनी मला म्हटले होते, तुला न्यूझीलंडकडून सर्वाधिक धावा बनविणारा खेळाडू बनायचे आहे.”
क्रो यांचे शब्द खरे ठरले
मार्टिन क्रो यांनी प्रोत्साहित केल्यानंतर रॉस टेलरने त्यांचे शब्द खरे करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अखेरीस त्याला यश आले आणि सर्वच बाबतीत तो न्यूझीलंडचा ‘सार्वकालीन महान फलंदाज’ बनला. रॉसच्या क्रिकेट कारकिर्दीकडे पाहिले असता लक्षात येते की, निवृत्तीनंतर क्रिकेटच्या इतिहासात त्याचे नाव कायमचे कोरले गेले असेल. रॉस क्रिकेट जगतातील पहिला आणि एकमेव असा क्रिकेटपटू आहे ज्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर १०० कसोटी, १०० वनडे व १०० टी२० सामने खेळण्याची किमया केली आहे.
सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असलेल्या काही मोजक्याच, खऱ्या अर्थाने वरिष्ठ खेळाडूंमध्ये त्याचा समावेश होतो. सलग दोन वनडे विश्वचषकाच्या अंतिम फेरीत खेळूनही तो ट्रॉफी उंचावू शकला नाही. पण आपल्या कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात ‘जागतिक कसोटी चॅम्पियनशिप’ची गदा मात्र त्याने न्यूझीलंड संघासमवेत उचलली. काही दिवसांपूर्वीच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
वाचा –
विश्वचषक गाजवणारा परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये छाप न पाडू शकणारा कायरन पॉवेल