भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये अवघ्या काही तासांतच पहिल्या वनडे सामन्याचा थरार रंगणार आहे. या मालिकेतील पहिला वनडे सामना आज (१८ जुलै) कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जाणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून श्रीलंका संघाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले आहे. त्यामुळे श्रीलंका क्रिकेट बोर्डाने भारतीय संघाविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी नवीन कर्णधाराची निवड केली आहे. या मालिकेत दासुन शनाका श्रीलंका संघाचे नेतृत्व करणार आहे. पहिल्या वनडे सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत शनाकाने मालिकेत विजय मिळवण्याबद्दल भाष्य केले आहे.
भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडू इंग्लडमध्ये कसोटी मालिकेसाठी सराव करण्यात व्यस्त आहेत. भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये येत्या ४ ऑगस्टपासून ५ कसोटी सामन्यांचा थरार रंगणार आहे. त्यामुळे या श्रीलंका दौऱ्यावर युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे श्रीलंका संघाचा कर्णधार शनाकाचे म्हणणे आहे की, या मालिकेत दोन्ही संघांना विजयाची समान संधी असणार आहे.
तो पुढे म्हणाला की, “हा, आम्हाला देखील याचा चांगलाच फायदा होणार आहे. कारण भारतीय संघाने त्यांच्याच ताफ्यातील नव्या खेळाडूंना यापुर्वी आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळताना पाहिले नाही. आयपीएलमध्ये ते खेळाडू खेळले आहेत. परंतु त्यांना आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव नाही. मला वाटते की, त्यांना या नवीन खेळाडूंसाठी तयारी करावी लागेल.”
सध्या श्रीलंका संघाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत शनाकाला संघाचे नेतृत्वपद देण्यात आले आहे. याबाबत बोलताना तो म्हणाला, “होय, हे नेहमीच एक आव्हान असते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि बाहेरील समस्या यांचा तुमच्यावर परिणाम होत असतो. हे सर्व ठीक आहे, परंतु दिवसाच्या शेवटी एक संघ म्हणून तुम्हाला चांगली करावी लागेल. ही आमच्यासाठी एक चिंतेची बाब आहे. मला विश्वास आहे की, संघातील खेळाडू याचा नक्की विचार करतील.” (Both teams have equal chances says srilanka team captain dasun shanaka)
वनडे मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल,ऋतुराज गायकवाड़, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, नितीश राणा, ईशान किशन (यष्टिरक्षक), संजू सॅमसन (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या, क्रुणाल पंड्या, कृष्णप्पा गौतम, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, राहुल चाहर, दीपक चाहर, भुवनेश्वर कुमार ( उपकर्णधार), चेतन सकारिया आणि नवदीप सैनी.
वनडे मालिकेसाठी असा आहे श्रीलंका संघ
दासुन शनाका (कर्णधार), धनंजय डिसिल्वा (उपकर्णधार), अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्षे, पथुम निसंका, चरित असलंका, वनिंदु हसरंगा, आशेन बंडारा, मिनोड भानुका, लाहिरु उदारा, रमेश मेंडिस, चमिका करुणारत्ने, दुष्मंथा चमीरा, लक्षण संदाकन, अकिला धनंजय, शिरन फर्नांडो, धनंजय लक्षण, ईशान जयरत्ने, प्रवीण जयविक्रेमा, असिथा फर्नाडो, कासुन रजिता, लाहिरु कुमारा आणि इसुरु उदाना.
महत्त्वाच्या बातम्या-
कर्णधार धवन म्हणाला, कोहली अन् शास्त्रींच्या ‘खास खेळाडू’ला श्रीलंकेत खेळवणार; पण कोण आहे तो?
भारत-श्रीलंका मालिकांसाठी समालोचकांचे पॅनेल जाहीर, भारताच्या ‘या’ २ दिग्गजांचा समावेश
‘गब्बर’कडे सुवर्णसंधी! एक-दोन नव्हे, तर ‘हे’ ५ विक्रम करु शकतो धवन ; गांगुलीलाही मागे टाकण्याची संधी






