जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा पहिला हंगाम नुकताच संपुष्टात आला. २०१९ ते २०२१ या कालावधीत खेळवल्या गेलेल्या या स्पर्धेची सांगता भारत विरुद्ध न्यूझीलंडच्या अंतिम सामन्याने झाली. न्यूझीलंड संघाने या सामन्यात भारताचा ८ गडी राखून पराभव करत या पहिल्यावाहिल्या स्पर्धेचे जेतेपद पटकावले.
ही स्पर्धा पार पडल्यावर आता अनेक क्रिकेट विश्लेषकांनी आणि माजी खेळाडूंनी या स्पर्धेतील खेळाडूंच्या प्रदर्शनाच्या आधारावर सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन निवडायला सुरुवात केली आहे. यात आता ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू ब्रॅड हॉगची देखील भर पडली आहे. त्याने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील कामगिरीच्या आधारावर सर्वोत्तम अकरा खेळाडूंचा संघ निवडला आहे. यात त्याने चार भारतीय खेळाडूंना देखील स्थान दिले आहे.
गुणवत्तेला दिले महत्व
ब्रॅड हॉगने हा संघ निवडताना सांख्यिकी कामगिरीला महत्व न देता गुणवत्तेला महत्व दिले आहे. कारण कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारे मार्नस लॅब्यूशेन आणि दुसर्या क्रमांकावरील जो रूट यांना या संघात स्थान मिळालेले नाही. तसेच गोलंदाजीत सर्वाधिक विकेट्स घेणार्या आर अश्विनला स्थान मिळाले असले तरी त्याच्या एक विकेट मागे असणार्या पॅट कमिन्सला मात्र स्थान मिळाले नाही.
‘या’ खेळाडूंना मिळाले स्थान
या संघात सलामीवीराच्या स्थानांवर भारताचा रोहित शर्मा आणि श्रीलंकेचा दिमुथ करुणारत्ने यांची निवड हॉगने केली आहे. तर मधल्या फळीत केन विलियम्सन, स्टीव्ह स्मिथ आणि बाबर आझम यांचा समावेश केला आहे. यष्टीरक्षक म्हणून भारताचा रिषभ पंत आणि अष्टपैलू म्हणून बेन स्टोक्स यांची निवड या संघात झाली आहे.
गोलंदाजी विभागात ब्रॅड हॉगने दोन भारतीय गोलंदाजांना स्थान दिले आहे. आर अश्विनने एकमेव फिरकीपटूची जागा घेतली असून मोहम्मद शमीचाही यात समावेश झाला आहे. या दोघांव्यतिरिक्त इंग्लंडचा स्टुअर्ट ब्रॉड आणि न्यूझीलंडचा कायले जेमिसन हे संघातील उर्वरित दोन वेगवान गोलंदाज आहेत. हॉगने या संघाच्या नेतृत्वाची धुरा कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावणारा कर्णधार केन विलियम्सनकडे दिले आहे.
ब्रॅड हॉगचा कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा सर्वोत्तम संघ –
रोहित शर्मा, दिमुथ करुणारत्ने, केन विलियम्सन (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, बाबर आझम, बेन स्टोक्स, रिषभ पंत (यष्टीरक्षक), आर अश्विन, स्टुअर्ट ब्रॉड, कायले जेमिसन, मोहम्मद शमी.
महत्वाच्या बातम्या-
ओहो… क्या बात है! पराभवाची पर्वा न करत किंग कोहली अनुष्कासोबत लुटतोय ‘या’ गोष्टीचा आनंद
अजबच! WTC फायनलचं टेंशन घेऊन चक्क बाथरुममध्ये लपला होता जेमिसन, वाचा मजेदार किस्सा
अरेरे! २४ वर्षीय क्रिकेटपटूचं फुटकं नशीब, बड्डे दिवशी पदार्पण केलं; पण शून्यावर तंबूत परतला