---Advertisement---

“बुमराह एकटाच मालिकेत फरक निर्माण करू शकतो”, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने केली स्तुती

On: बुधवार, डिसेंबर 16, 2020 6:35 AM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना १७ डिसेंबरपासून ऍडलेड येथे खेळला जाईल. दोन्ही संघ सध्या कसोटी मालिकेच्या तयारीत चांगलाच घाम गाळत आहेत. ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार ऍलन बॉर्डर यांनी या मालिकेविषयी आपले मत मांडले आहे. त्यांनी म्हटले की, या मालिकेत भारताला जिंकायचे असेल, तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

बुमराहचे केले कौतुक
ऑस्ट्रेलियाचे सर्वकालीन महान कर्णधार असलेल्या बॉर्डर यांनी बुमराहचे तोंडभरून कौतुक केले. बॉर्डर म्हणाले, “माझ्यामते, बुमराह एकटाच मालिकेत फरक निर्माण करू शकतो. मी स्वतः बुमराहचा एक मोठा चाहता आहे. त्याने स्वत: ला तंदुरुस्त ठेवले, तर तो संघाला एकहाती सामना जिंकून देऊ शकतो. मला त्याच्याबद्दल थोडी काळजी वाटत आहे. कारण, ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्यांवर चेंडूला बाउन्स आणि हरकत मिळते.”

बॉर्डर यांनी पुढे बोलताना सांगितले, “बुमराह पूर्ण लयीमध्ये असतो, तेव्हा तो सर्वोत्कृष्ट गोलंदाज भासतो. कोणत्याही संघाला सामना जिंकण्यासाठी वीस बळी घेण्याची आवश्यकता असते, बुमराह त्याबाबतीत भारताला मदत करू शकतो. तो कायम खेळाचा आनंद घेत असलेला पाहायला मिळतो.”

मागील मालिकेत बुमराहची कामगिरी राहिली होती उल्लेखनीय
बुमराहने सन २०१८-२०१९ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये २१ बळी घेत भारताला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. आगामी मालिकेत इशांत शर्माच्या अनुपस्थितीत बुमराह भारताच्या गोलंदाज आक्रमणाचे नेतृत्व करेल.

भारताला जाणवेल विराटची कमी
बॉर्डर यांनी आगामी मालिकेत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची उणीव भासेल असे म्हटले. बॉर्डर म्हणाले, “मला वाटतंय विराटच्या जाण्याने भारताची फलंदाजी वेगळी वाटेल. त्याच्या फक्त मैदानावर असण्याने फरक पडतो. ऑस्ट्रेलियन गोलंदाज कदाचित खुश असतील की, त्यांना विराटला गोलंदाजी करावी लागणार नाही.”

विराट पालकत्व रजा घेऊन परतणार आहे भारतात
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान १७ डिसेंबर पासून चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होईल. मालिकेतील पहिला कसोटी सामना ऍडलेड येथे दिवस-रात्र स्वरूपात गुलाबी चेंडूने खेळली जाईल. भारताचा कर्णधार विराट कोहली पहिली कसोटी खेळल्यानंतर, पालकत्व रजा घेऊन भारतात परतेल. त्यानंतर उर्वरित तीन सामन्यात अजिंक्य रहाणे भारताचे नेतृत्त्व करेल.

महत्त्वाच्या बातम्या-

अख्खा पब्लिक जानता है कौन आने वाला है..! रोहित ऑस्ट्रेलियाला रवाना झाल्यानंतर सोशल मीडियावर भन्नाट मिम्सचा वर्षाव

सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यात ‘या’ ऑस्ट्रेलियन दिग्गजाचे पुनरागमन, २०१६ला जिंकून दिलीय ट्रॉफी 

साहा की पंत, कोण असेल भारताचा यष्टीरक्षक? गावसकरांनी सांगितली त्यांची पसंती

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---