गुरुवारी (२४ फेब्रुवारी) श्रीलंकेविरुद्ध पार पडलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात भारतीय संघाने ६२ धावांनी धमाकेदार विजय मिळवला. या सामन्याचा हिरो इशान किशन (Ishan Kishan) ठरला. त्याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आता भारतीय संघ शनिवारी (२६ फेब्रुवारी) धरमशाला येथे होणारा दुसऱ्या टी२० सामनाही जिंकून मालिका आपल्या खिशात घालण्याचा प्रयत्न करेल. मागील वर्षी टी२० विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर भारताने आपल्या रणनितीमध्ये काही बदल करत धमाकेदार पुनरागमन केले आहे. युवा खेळाडूंना संधी देत आता भारतीय संघ एकदम नव्या अंदाजात यशाची शिखरे चढत आहे.
येत्या ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया येथे टी२० विश्वचषक होणार आहे. मात्र, यासाठी अजून बराच काळ आहे. असे असले, तरीही रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वातील भारतीय संघात खेळाडूंचा एक गट तयार आहे, ज्याचे या विश्वचषकात खेळणे जवळपास नक्की मानले जात आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना धावा काढण्यासाठी संघर्ष काढणारा युवार सलामीवीर इशान किशनने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्याच टी२० सामन्यात आक्रमक आणि मोठी खेळी करत पुन्हा आत्मविश्वास मिळवला.
ऋतुराज गायकवाडच्या फिटनेसवर शंका
भारतीय संघाचा स्टार फलंदाज ऋतुराज गायकवाडच्या (Ruturaj Gaikwad) मनगटाला दुखापत झाली नसती, तर तो इशानसोबत डावाची सुरुवात करू शकला असता. तसेच रोहित मधल्या फळीत उतरला असता. ज्याप्रकारे त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध केले होते. ऋतुराजने जर फिट होऊन पुनरागमन केले, तर तो शनिवारी (२७ फेब्रुवारी) पुन्हा अशी कामगिरी करू शकतो. रोहित चांगल्या लयीत असल्याचे दिसत आहे आणि त्याने पहिल्या टी२० सामन्यात ४४ धावांची खेळीही केली आहे. या सामन्यासाठी विराट कोहलीला विश्रांती दिल्यानंतर श्रेयस अय्यरने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळताच, त्या संधीचं सोनं करत अर्धशतक झळकावले.
संजू सॅमसनवर असेल नजर
अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) वरच्या फळीत फलंदाजी करणार असल्याचे संकेत रोहितने पहिल्या सामन्यानंतर दिले आहेत. कारण संघ व्यवस्थापनाला त्याच्या फलंदाजी कौशल्याचा फायदा उचलायचा आहे. या मालिकेत संघात पुनरागमन करणाऱ्या संजू सॅमसनला (Sanju Samson) पहिल्या सामन्यात संधी मिळाली नाही. त्याला धरमशाला येथे होणाऱ्या दुसऱ्या टी२० सामन्यात संधी मिळाली, तर तो या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न करेल. भारतीय गोलंदाजी फळीदेखील दमदार कामगिरी करत आहे. पहिल्या टी२० सामन्यात भारतीय संघाने पदार्पणवीर दीपक हुडासह सात पर्यायांचा वापरही केला. यावेळी वेंकटेश अय्यर जरा महागडा ठरला, पण त्याने २ विकेट्सही आपल्या खिशात घातले.
श्रीलंकेला परिस्थितीशी जुळवून घेणे राहील कठीण
दुसरीकडे श्रीलंका संघाला भारताचा १० सामन्यांपासून सुरू असलेला विजयरथ थांबवायचा असेल, तर त्यासाठी त्यांना कसून प्रयत्न करावे लागतील. वरच्या फळीकडून अनपेक्षित कामगिरी आणि मुख्य फिरकीपटू महीश तीक्ष्णा तसेच वनिंदू हसरंगाच्या अनुपस्थितीत श्रीलंका संघ संघर्ष करताना दिसला. लखनऊ सामन्याच्या तुलनेत धरमशाला येथे जास्त थंडी असण्याची शक्यता आहे. खेळाडूंना अशा परिस्थितीशी लवकरात लवकर जुळवून घ्यावे लागेल.
असे आहेत दोन्ही संघ
भारत
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, दीपक हुडा, वेंकटेश अय्यर, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल, ऋतुराज गायकवाड, रवी बिश्नोई, आवेश खान, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव.
श्रीलंका
पथुम निसांका, कामिल मिशारा, चरित असलांका, दिनेश चंडीमल (यष्टीरक्षक), जेनिथ लियानागे, दसून शनाका (कर्णधार), चमिका करुणारत्ने, दुष्मंथा चमीरा, प्रवीण जयविक्रमा, जेफरी वेंडरसे, लाहिरू कुमारा, दनुष्का गुणाथिलका, एशियाई डेनियल, शिरन फर्नांडो , बिनुरा फर्नांडो.
महत्त्वाच्या बातम्या-
द्रविड-गांगुलीसोबतली चर्चा उघड करणे वृद्धिमान सहाला पडणार महागात? बीसीसीआय घेऊ शकते मोठा निर्णय
‘कर्णधार’ रोहित शर्माचा मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून होणार मोठा सन्मान, कारणही आहे खास