आयपीएल २०२६ च्या तयारीसाठी सर्व संघ जोरदार सराव करत आहे. २८ मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या या १९ व्या हंगामासाठी काही संघांनी त्यांच्या खेळाडूंच्या फलंदाजी क्रमांकाबाबत महत्वाचे निर्णय घेतले आहे. दिल्ली कॅपिटल्सने केएल राहुल याला सलामीसाठी निश्चित केले आहे, दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्जने (सीएसके) देखील त्यांचे सलामीवीर निश्चित केले आहे.
सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने खुलासा केली की, त्याच्यासोबत डावाची सुरूवात करण्यास संजू सॅमसन येणार आहे. गेल्या हंगामातील सीएसकेची कामगिरी निराशाजनक राहिली होती, त्यामागचे कारण त्यांच्या सलामीवीरांची खराब कामगिरी. त्यांनी सलामी जोडीमध्ये अनेकदा बदल केले मात्र अपयशी ठरले होते. ऋतुराजला २०२५ च्या हंगामात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले होते. त्यानंतर आयुष म्हात्रेला संधी दिली. त्याने काही डावांमध्ये संघाला चांगली सुरूवात करून दिली, मात्र आयपीएल २०२६ साठी संजूला संघात घेतल्याने सीएसके कोणाला सलामीसाठी उतरवणार याची चर्चा सुरू होती.
मुंबईमध्ये बुधवारी (२५ मार्च) झालेल्या सर्व कर्णधारांच्या बैठकीवेळी ऋतुराजला सीएसकेच्या सलामीजोडीबाबत विचारले गेले आणि त्याने तो संजूसोबत सलामीला येणार, असे सांगितले आहे. त्यामुळे आयुष तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येणार आहे. आयुषने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना आयपीएल पदार्पण केले होते.
संजूने राजस्थान रॉयल्ससाठी अनेकदा सलामीला फलंदाजी केली आहे. २०२५ च्या हंगामात यशस्वी जायसवाल आणि वैभव सूर्यवंशी यांच्यामुळे तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. ऋतुराजनेही आयपीएलच्या कारकिर्दीची सुरूवात मधल्या फळीत केली होती. त्यानंतर तो सलामीला आला आणि त्याच्या कारकिर्दीला नवे वळण मिळाले. २०२१ च्या हंगामात ऑरेंज कॅप जिंकल्यानंतर त्याला सीएसकेने सलामीवीर म्हणून निश्चित केले होते, मात्र नेतृत्वाची जबाबदारी घेतल्यानंतर तो २०२४ आणि २०२५ च्या हंगामात खूपदा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने ८ डावांमध्ये २०८ धावा केल्या. तसेच सलामीला येताना ६० डावांमध्ये २२८९ धावा केल्या आहेत.
संजूने वेगवेगळ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे, मात्र सलामीच्या वेळी त्याची कामगिरी सर्वोत्तम राहिली आहे. भारतासाठी त्याने सलामीला येताना टी२० मध्ये तीन शतके केली आहेत. तसेच नुकतेच पार पडलेल्या टी२० विश्वचषक २०२६ मध्ये त्याचा जबरदस्त फॉर्म दिसला. त्याने संघाला धमाकेदार सुरूवात करून दिली आणि विजेतेपद जिंकण्यात मोठी भुमिका पार पाडली.
आता या पुन्हा एकदा नव्या जोडीने सीएसके सहाव्या विजेतेपद जिंकण्याच्या प्रयत्नात आहेत.





