भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांची पत्नी निर्मल कौर यांचे रविवारी (१३ जून) कोविड-१९ विरुद्ध लढताना निधन झाले. वयाच्या ८५ व्या वर्षी तीन आठवडे कोविड विरुद्ध लढल्यानंतर मोहालीमधील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. निर्मल कौर या भारतीय महिला व्हॉलिबॉल संघाच्या माजी कर्णधार राहिल्या आहेत. त्यांच्या व्हॉलीबॉलमधील योगदानाबद्दल आता त्यांच्या नावाने एक व्हॉलीबॉल स्पर्धा सुरू करण्यात येणार आहे.
निर्मल कौर यांच्या नावाने सुरू होणार स्पर्धा
भारतीय महिला व्हॉलीबॉल संघाच्या माजी कर्णधार राहिलेल्या निर्मल कौर यांच्या निधनानंतर अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष व चंदिगड व्हॉलीबॉल असोसिएशनचे सदस्य विजयपाल सिंग यांनी म्हटले, “चंदिगड आणि पंजाबमध्ये व्हॉलीबॉल प्रसिद्ध करण्यासाठी निर्मल कौर यांनी दिलेले योगदान कधीही विसरता येणार नाही. संपूर्ण शहरात त्यांनीच खेळाचे इन्फ्रास्ट्रक्चर उभे केले. त्यांच्या या कार्यासाठी आम्ही चंदीगडमध्ये त्यांच्या नावाने कनिष्ठ मुले आणि मुली यांच्यासाठी स्पर्धा आयोजित करणार आहोत.”
भारतीय व्हॉलीबॉल संघाचं नेतृत्व केल्यानंतर त्यांनी प्रशासनात आपला जम बसवला. चंदीगड मध्ये सर्व खेळांचे सेंटर उभे करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. निर्मल कौर यांचे चंदिगडमध्ये वॉटर क्लब तसेच, सेक्टर ४२ मध्ये हॉकी स्टेडियम उभारण्यात सिंहाचा वाटा होता. चंदिगड व्हॉलीबॉल असोसिएशनच्या त्या दहा वर्ष अध्यक्ष होत्या.
मिल्खा सिंग यांची पत्नी म्हणून मिळाली ओळख
भारताचे सर्वकालीन महान ॲथलिट म्हणून ओळख असलेले वेगवान धावपटू मिल्खा सिंग यांची सहचारिणी म्हणून त्यांना वेगळी ओळख मिळाली. त्यांचा मुलगा जीव मिल्खा सिंग हा देखील आंतरराष्ट्रीय स्तरावरील गोल्फपटू राहिला आहे. ९१ वर्षीय मिल्खा सिंग हे देखील अद्याप कोविड-१९ शी झुंज देत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
ब्रेकिंग: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा, विराट कर्णधार तर…
WTC Final: भारताविरुद्धच्या सामन्यासाठी न्यूझीलंडचा संघ साऊथम्पटनमध्ये दाखल
भारतीय महिला संघाने कसली कंबर, ऐतिहासिक सामन्यासाठी झाल्या सज्ज