बीसीसीआयचे सचिव म्हणून कायम चर्चेत राहणारे जय शाह आता आयसीसीचे अध्यक्ष बनले आहेत. मंगळवारी (27 ऑगस्ट) त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा झाली.
जय शाह आयसीसीचे अध्यक्ष बनल्यानंतर पुढील वर्षी होणाऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनलच्या ठिकाणाबद्दल चर्चा सुरु झाली आहे. WTC चा अंतिम सामना इंग्लंडच्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळला जाणार आहे, मात्र शक्यता आहे की यामध्ये बदल पाहायला मिळू शकतो. यामागचं मोठं कारण म्हणजे, जय शाह यांनी यापूर्वी स्वत: फायनलचं व्हेन्यू बदलण्याबाबत वक्तव्य केलं होतं.
जागतिक कसोटी चॅम्पियनशीपचे दोन्ही अंतिम सामने लॉर्ड्स मैदानावर झाले आहेत. जय शाह यावर्षी मे महिन्यात व्हेन्यू मध्ये बदल करण्याबाबत बोलले होते. त्यावेळी न्यूझीलंडचे ग्रेग बार्कले आयसीसीचे अध्यक्ष होते. मात्र आता जय शाह यांनी हे पद स्वीकारल्यानंतर ते यावर काही निर्णय घेतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पहिली जागतिक कसोटी चॅम्पियनशीप 2019 ते 2021 दरम्यान खेळली गेली होती. यामध्ये भारत आणि न्यूझीलंडनं उत्कृष्ट कामगिरी करत फायनलमध्ये धडक मारली. मात्र लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या फायनल मॅचमध्ये भारताची कामगिरी खराब राहिली होती. न्यूझीलंडनं या सामन्यात 8 विकेटनं विजय मिळवून पहिला खिताब जिंकला.
यानंतर 2021 ते 2023 दरम्यान दुसरी जागतिक कसोटी चॅम्पियनशीप खेळण्यात आली. यामध्ये देखील भारताची कामगिरी उत्कृष्ट होती. टीम इंडियानं सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये धडक मारली. मात्र अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून 209 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.
सध्याच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशीप देखील भारतीय संघाची दमदार कामगिरी जारी आहे. टीम इंडिया गुणतालिकेत अव्वल स्थानी असून, फायनलमध्ये पोहचण्याची प्रबळ दावेदार आहे.
हेही वाचा –
कोण आहेत रोहन जेटली? जे जय शाह यांच्यानंतर बीसीसीआयचे सचिव बनू शकतात
जय शाह आयसीसी अध्यक्ष बनले, आता बीसीसीआयचे सचिव कोण होणार? हे 3 नावं आघाडीवर
महिला, अपंग आणि कसोटी क्रिकेटमध्ये होणार मोठा बदल! ICC अध्यक्ष जय शहांची पहिली प्रतिक्रिया