गोवा- इंडियन सुपर लीगमध्ये ( आयएसएल) रविवारी जमशेदपूर एफसीने एकहाती वर्चस्व गाजवले. चेन्नईयन एफसीच्या बचावफळीला पहिल्याच ४० मिनिटांत खिळखिळीत करून जमशेदपूर संघाने बाजी मारली. रित्विक दास (२३ मि.) , बोरिस सिंग ( ३३ मि.) , व डॅनिएल चुक्वू ( ४० मि.) यांच्या गोलने जमशेदपूरच्या विजयाचा मजबूत पाया रचला. त्यात दीपक देवरानी (४६ मि.) स्वयंगोलने चेन्नईयनला आणखी बॅकफूटवर फेकले. आज जमशेदपूरचा खेळ सर्व आघाड्यांवर उजवा ठरला. चेन्नईयन एफसीकडून एकमेव गोल नेरियस व्हॅलस्किस (६२ मि. ) याने केला. जमशेदपूरने विजयी हॅटट्रिक साजरी करताना ३१ गुणांसह दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. दुसरीकडे या पराभवामुळे चेन्नईयन यांच्या उपांत्य फेरीच्या आशा जवळपास मावळल्या.
उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी चेन्नईयन एफसीला आता विजय शिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. पण, टॉप फोअर मध्ये असलेल्या जमशेदपूर एफसीने सुरुवातीपासून सामन्यावर पकड घेतली. ६व्या मिनिटाला बोरिस सिंग गोल करण्याच्या अगदी नजीक पोहोचला, पण त्याने मारलेला चेंडू थेट गोलरक्षकाच्या हातात विसावला. ११व्या मिनिटाला जितेंद्र सिंगला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले आणि जमशेदपूरसाठी हा मोठा धक्का होता. पण, तरीही जमशेदपूर खचले नाही. २३ व्या मिनिटाला रित्विक दासने जमशेदपूरचे गोलखाते उघडले. त्यानंतर ३३ व ४०व्या मिनिटाला अनुक्रमे बोरिस सिंग व डॅनिएल चुक्वू यांनी गोल करून जमशेदपूरची आघाडी ३-० अशी भक्कम केली
दुष्काळात तेरावा महिना अशी आज चेन्नईयनची अवस्था झाली. ४६व्या मिनिटाला ग्रेग स्टीवर्टने बॉक्सबाहेरून घेतलेला शॉट्स अडवण्याच्या प्रयत्नात दीपक देवरानीच्या पायाला लागून गोलजाळीत विसावला. दीपकच्या स्वयंगोलने जमशेदपूरची आघाडी ४-० अशी मजबूत केली. ६२व्या मिनिटाला नेरियस व्हॅलस्किसच्या गोलने चेन्नईयनचे खाते उघडले. एरियल बोरीसीयूकने केलेला प्रयत्न जमशेदपूरचा गोलरक्षक टीपी रेहेनेशने अडवला, परंतु तो चेंडूवर ताबा राखू शकला नाही. त्यात व्हॅलिस्किसने संधी साधली अन् गोल केला. जमशेदपूरचा संघ आज आक्रमक खेळायचे याच निर्धाराने मैदानावर उतरला होता. त्यांनी १० ऑन टार्गेट प्रयत्न केले, प्रत्युत्तरात चेन्नईयकडून चारच प्रयत्न झाले. जमशेदपूरने हा सामना ४-१ असा जिंकला.
निकाल – जमशेदपूर एफसी ४ ( रित्विक दास २३ मि., बोरिस सिंग ३३ मि., डॅनिएल चुक्वू ४० मि., दीपक देवरानी ४६ मि. ( स्वयंगोल) ) विजयी विरुद्ध चेन्नईयन एफसी १ ( नेरियस व्हॅलस्किस ६२ मि. )
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल २०२२ चे वेळापत्रक जाहीर होण्यास का होतोय विलंब? कारण आले पुढे
हॅप्पी बर्थडे…! वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशा नेगीला रिषभ पंतने स्पेशल फोटो शेअर करत केले विश
पुजाराची धुव्वादार खेळी आणि १०व्या विकेटसाठीची अभेद्य भागीदारी, सौराष्ट्रने मुंबईविरुद्ध टाळला पराभव