गोवा| हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) रविवारी दुसऱ्या सामन्यात केरला ब्लास्टर्स आणि चेन्नईयीन एफसी यांच्यातील लढत 1-1 अशी बरोबरीत सुटली. अखेरच्या दहा मिनिटांत चेन्नईयीनचा एक खेळाडू कमी होऊनही ब्लास्टर्सला फायदा उठविता आला नाही. या दोन्ही संघांच्या सातव्या मोसमात बाद फेरी गाठण्याच्या आशा यापूर्वीच संपुष्टात आल्या होत्या.
बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर हा सामना झाला. मध्यंतरास 1-1 अशी बरोबरी होती. निर्धारीत वेळेत ती कायम राहिली. चेन्नईयीनचे खाते दहाव्याच मिनिटाला मध्य फळीतील ताजिकीस्तानचा 30 वर्षीय खेळाडू फातखुलो फातखुल्लोएव याने उघडले. ब्लास्टर्सने 29व्या मिनिटाला बरोबरी साधली. आघाडी फळीतील इंग्लंडचा 33 वर्षीय गॅरी हूपर याने पेनल्टीवर गोल केला.
चेन्नईयीनचे आठवे, तर ब्लास्टर्सचे दहावे स्थान कायम राहिले. चेन्नईयीनच्या मोहिमेची सांगता झाली. 20 सामन्यांत त्यांना अकरावी बरोबरी पत्करावी लागली. तीन विजय व सहा पराभव अशी त्यांची कामगिरी झाली. त्यांचे 20 गुण झाले.
ब्लास्टर्सला 19 सामन्यांत आठवी बरोबरी पत्करावी लागली असून तीन विजय व आठ पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 17 गुण झाले.
सामन्याची सुरुवात चुरशीने झाला. चेन्नईयीनने सर्वप्रथम खाते उघडले. दहाव्या मिनिटाला मध्यरक्षक एडवीन वन्सपॉल याने मध्य क्षेत्रातून चाल रचली. उजवीकडून त्याने दिलेल्या पासवर फातखुलो याने डाव्या पायाने फटका मारला. ब्लास्टर्सचा गोलरक्षक अल्बिनो गोम्स याला झेप टाकूनही फटका अडविता आला नाही.
ब्लास्टर्सला 28व्या मिनिटाला पेनल्टी मिळाली. गोलक्षेत्रात हवेतून आलेल्या चेंडूवर ताबा मिळविण्यासाठी चेन्नईयीनचा बचावपटू दिपक तांग्री आणि ब्लास्टर्सचा स्ट्रायकर जॉर्डन मरे यांच्यात चुरस झाली. त्यावेळी चेंडू दिपकच्या दंडाला लागला. त्यामुळे रेफरी प्रतिक मोंडल यांनी ब्लास्टर्सला पेनल्टी बहाल केली. हुपरने ही पेनल्टी घेताना चेन्नईयीनचा गोलरक्षक विशाल कैथ याला यशस्वीरित्या चकविले.
दुसऱ्या सत्रात चेन्नईयीनचा बचावपटू इनेस सिपोविच याला दहा मिनिटे बाकी असताना मैदान सोडावे लागले. त्याने प्रशांत करुथादाथ्कुनी याला पाडले. त्याआधी पहिल्या सत्रात 31व्या मिनिटाला त्याने हुपरला पाडले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
आयएसएल २०२०-२१: बेंगळुरूला हरवून गोवा तिसऱ्या स्थानी
आयएसएल २०२०-२१ : बदली खेळाडूंमुळे जमशेदपूरचा मुंबईला पराभवाचा धक्का
आयएसएल २०२०-२१ : कोलकता डर्बी जिंकत एटीके मोहन बागानची आघाडी भक्कम