सध्या भारतात इंडियन प्रीमियर लीगचा पंधरावा हंगाम खेळला जात आहेत. भारतीय संघातील जवळपास सर्वच प्रमुख क्रिकेटपटू यात सहभागी झालेत. मात्र, नुकतेच कसोटी संघातून आपली जागा गमावलेला तसेच आयपीएलमध्ये विकला न गेलेला अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळताना दिसतोय. यावर्षी ससेक्स (Sussex County) संघाशी करारबद्ध झालेल्या पुजाराने आपल्या हंगामातील पहिल्याच सामन्यात शानदार द्विशतकी खेळी करत संघाला पराभवापासून वाचवले.
पदार्पणात पुजाराचे द्विशतक
आयपीएलमध्ये कोणत्याही संघाने करारबद्ध न केल्याने पुजाराने इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला होता. ससेक्स संघाकडून १४ एप्रिल रोजी सुरू झालेल्या डर्बीशायर संघाविरुद्धच्या सामन्यातून पदार्पण केले. त्याच्यासोबत पाकिस्तानचा यष्टीरक्षक मोहम्मद रिजवान हा देखील प्रथमच ससेक्स संघाशी जोडला गेला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना डर्बीशायरने आपल्या पहिल्या डावात ८ बाद ५०५ धावांची मजल मारली होती. प्रत्युत्तरात, ससेक्सचा पहिला डाव अवघ्या १७४ धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे डर्बीशायरने ससेक्सला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला.
पहिल्या डावात केवळ ६ धावा केलेला पुजारा दुसऱ्या डावात चांगलाच फॉर्ममध्ये दिसला. त्याने नाबाद २०१ धावांची खेळी केली. दुसऱ्या बाजूने संघाचा कर्णधार टॉम हेन्स यानेही २४३ धावा जमविल्या. परिणामी, ससेक्सने ३ बाद ५१३ धावा करून सामना अनिर्णीत सोडवला.
Enjoyed my debut game for @SussexCCC. Glad that I could contribute to the team's cause. Looking forward to the next game! pic.twitter.com/YHxrhwBaZw
— Cheteshwar Pujara (@cheteshwar1) April 17, 2022
बर्याच दिवसांनी आले शतक
पुजाराच्या बॅटमधून तब्बल २७ महिन्यांनंतर हे शतक आले आहे. त्याने अखेरच्या वेळी २०२० रणजी ट्रॉफी सामन्यात सौराष्ट्रकडून खेळताना कर्नाटकविरुद्ध शतक साजरे केले होते. तर त्याचे शेवटचे आंतरराष्ट्रीय शतक २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आलेले. खराब फॉर्ममूळे पुजाराला भारतीय संघातील आपली जागा गमवावी लागली आहे. तो या काउंटी चॅम्पियनशिपमध्ये सहा सामने खेळण्यासाठी उपलब्ध असेल. आयपीएलनंतर भारतीय संघ मॅंचेस्टर येथे इंग्लंडविरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळणार आहे. काऊंटीमध्ये चांगली कामगिरी केल्यास पुजाराचे भारतीय संघात पुनरागमन होऊ शकते.
महत्वाच्या बातम्या-
झेल पकडणं सोडा, साधे प्रयत्नही नाही केले! गुजरातच्या मॅच विनरचा कॅच सोडणाऱ्या दुबेवर भडकला जडेजा