रविवारी (२२ मे) बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात खेळल्या जाणाऱ्या टी२० मालिकेसाठी आणि इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या एकमात्र कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ घोषित केला. निवडकर्त्यांनी भारताच्या कसोटी संघात अनुभवी चेतेश्वर पुजाराला पुन्हा एकदा संधी दिली आहे. परंतु भारतीय दिग्गज आणि पुजाराचा चांगला मित्र अजिंक्य रहाणेला मात्र कसोटी संघातून वगळले गेले.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकमात्र कसोटी सामना १ जुलै रोजी सुरू होणार आहे. मागच्या वर्षी भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असताना कसोटी मालिकेतील शेवटचा सामना स्थगित केला गेला होता. आता तोच सामना यावर्षीच्या दौऱ्यात पुन्हा खेळवला जाणार आहे. भारतीय संघाने शेवटचा कसोटी सामना श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. श्रीलंकेविरुद्धच्या या मायदेशातील कसोटी मालिकेत चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) या दोन्ही दिग्गजांना वगळले गेले होते.
श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेनंतर अजिंक्य रहाणे कोलकाता नाईट रायडर्ससाठी आयपीएल २०२२ हंगाम खेळला, तर दुसरीकडे पुजाराला मात्र आयपीएलच्या मेगा लिलावात एकही खरेदीदार मिळाला नाही. याच कारणास्तव पुजारा काउंटी चॅम्पियनशिप २०२२ खेळण्यासाठी इंग्लंडमध्ये दाखल झाला. रहाणे आयपीएलमध्ये कमाल दाखऊ शकला नाही, पण पुजाराने मात्र काउंटी चॅम्पियनशिपमध्ये पुन्हा एकदा स्वतःची गुणवत्ता सिद्ध केली.
काउंटी संघ ससेक्ससाठी खेळताना पुजाराने पाच सामन्यात १२०च्या सरासरीने ७२० धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या दोन द्विशतकांचा आणि दोन शतकांचा समावेश आहे. या जबरदस्त प्रदर्शानंतर तो भारताच्या कसोटी संघात पुनरागमन करेल, अशी शक्यता होतीच, जी खरी ठरली. निवडकर्त्यांनी त्याला इंग्लंडविरुद्धच्या एकमात्र कसोटी सामन्यासाठी संघात निवडले आहे.
रहाणेला संघात न निवडण्यामागे पहिले कारण म्हणजे त्याचा खराब फॉर्म. पुजारा आणि रहाणे दोघांनाही सततच्या खराब प्रदर्शनामुळे संघातून एकत्र बाहेर केले गेले होते. पुजाराने चांगले प्रदर्शन करून संघात पुनरागमन केले, मात्र रहाणेला ते जमले नाहीये. आयपीएल २०२२ मध्ये रहाणेने अपेक्षित प्रदर्शन केले नाही. तसेच सरायझर्स हैदराबदविरुद्ध खेळताना त्याच्या पायाला गंभीर दुखापत देखील झाली. मिळालेल्या माहितीनुसार, रहाणेचे हॅमस्ट्रिंग दुखावले गेले आहे आणि त्याला यातून सावरण्यासाठी पुढचे काही आठवडे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत घालवावे लागणार आहेत.
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, आर अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेत रोहितसह भारताच्या ३ दिग्गजांना विश्रांती, पाहा कोण आहेत ते
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात ‘हा’ फलंदाज करणार पदार्पण, रणजी ट्रॉफीत झळकावलंय त्रिशतक