इंग्लंड क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज ख्रिस जॉर्डन (chris jordan) सध्या अपेक्षित प्रदर्शन करू शकत नाहीये. तो सध्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये कराची किंग्ज संघासाठी खेळत आहे. बुधवारी (१६ फेब्रुवारी) कराची किंग्ज आणि मुल्तान सुल्तान यांच्यात आमना-सामना झाला. सामन्यात जॉर्डनचे प्रदर्शन खास नव्हते. परंतु, अशी एक घटन घडली, ज्यामुळे तो भारतीय चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. जॉर्डनला आगामी आयपीएल हंगामापूर्वी एमएस धोनी (MS Dhoni) याच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्जने विकत घेतले आहे.
मुल्ताना सुल्तान आणि कराची किंग्जमध्ये झालेल्या या सामन्यात जॉर्डन अपेक्षित गोलंदाजी प्रदर्शन करू शकला नाही. त्याने या सामन्यात टाकलेल्या ४ षटकांमध्ये एकूण ५० धावा खर्च केल्या आणि एक विकेट घेतली. त्याच्या गोलंदाजीवर विरोधी संघातील फलंदाजांनी ५ चौकार आणि २ षटकारही मारेल. विरोधी संघाला तो धावा करण्यापासून रोखू शकला नाही. त्याच्या गोलंदाजीचा परिणाम संघावर पडला आणि कराची किंग्जने सामन्यात पराभव पत्करला. त्याच्या संघाने पीएसएल स्पर्धेत मिळालेला हा सलग ८ वा पराभव होता.
सामन्यादरम्यान समालोचकामध्ये जॉर्डनच्या खराब प्रदर्शनाची चर्चा सुरू होती. समालोचक म्हणाले की, “जॉर्डन सतत संघर्ष करत आहे. त्याची वेळ चांगली नाहीय.” त्यानंतर पुढे बोलताना समालोचकांनी अचानक एमएस धोनीचे नाव घेतले. ज्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. ते पुढे म्हणाला की, “जरा थांबा, जॉर्डन पुढली कोणती लीग खेळणार आहे, जरा ते पाहा. तो आयपीएल खेळणार आहे, जिथे एमएस धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्ज संघाचा भाग असेल. म्हणजे लोकांना तिथे जॉर्डनचा एक वेगळा अवतार आणि बदललेले रूप पाहायला मिळेल.” पाकिस्तानमध्ये खेळल्या जाणाऱ्या पीएसएलमध्ये धोनीचे हे गुणगान ऐकून भारतीय चाहतेही भारावले आहेत.
भारताचा माजी कर्णधार आणि सध्या चेन्नई सुपर किंग्जसाठी (Chennai Super Kings) नेतृत्व करणाऱ्या एमएस धोनीने आतापर्यंत अनेक खेळाडूंची कारकीर्द बनवली आहे. त्याच्या नेतृत्वात आयपीएलमध्ये खेळलेल्या अनेक खेळाडूंनी पुढे देशासाठी उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. धोनीला खेळाडूंची गुणवत्ता अचूक समजते आणि त्याच आधारावर फ्रेंचायझीने जॉर्डनला विकत घेतले असल्याचे सांगितले जात आहे. जॉर्डनसाठी सीएसकेने नुकत्याच पार पडलेल्या मेगा लिलावात तब्बल ३ कोटी ६० लाख रुपये खर्च केले आणि त्याला संघात घेतले.
महत्वाच्या बातम्या –
‘वर्ल्डकप हिरो’ राज बावाची रणजी पदार्पणाच्या पहिल्याच चेंडूवर कमाल
आयपीएल स्पर्धेच्या लिलावात धोनीच्या राज्यातील खेळाडू सर्वात पुढे, केली इतक्या कोटींची कमाई
सामना जिंकला, पण पोलार्डचे ते दोन शॉट पडले महागात; भारताचे ‘हे’ महत्त्वाचे खेळाडू जखमी