भारतातीस सर्वात मोठी टी२० लीग आयपीएलच्या १३ व्या मोसमावर कोरोना व्हायरसचे सावट पसरले आहे. भारत सरकारने १४ एप्रिलपर्यंत करण्यात आलेले लॉकडाऊन वाढवून ३० एप्रिल केली आहे. त्यामुळे बीसीसीआय आयपीएलचे आयोजन अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याची दाट शक्यता आहे.
कोरोना व्हायरस (Corona Virus) आणि व्हिसावरील निर्बंध यांमुळे २९ मार्चला होणारे आयपीएल १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आले होते. परंतु आता देशातील लॉकडाऊन वाढल्यामुळे बीसीसीआय आयपीएलचे आयोजन सप्टेंबरमध्ये करण्याचा विचार करत आहे. त्याच बरोबर केंद्र सरकारने १५ एप्रिलपर्यंत व्हिसावर निर्बंध लावण्यात आले होते. परंतु आता हे वाढवण्याची दाट शक्यता आहे.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने माध्यमांशी बोलताना सांगितले की, “पंजाब, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये यापूर्वीच लॉकडाऊनचा (Lockdown) कार्यकाळ वाढविण्यात आला आहे. जर देशातही हा निर्णय घेण्यात आला, तर अशा परिस्थितीत आयपीएलचे आयोजन होण्याची शक्यता नाही. या कारणामुळे आयपीएल रद्द केले जाऊ शकत नाही. परंतु अनिश्चित काळासाठी स्थगित केले जाऊ शकते.”
“आम्ही आयपीएल (IPL) रद्द करू शकत नाही. कारण, जर आयपीएल रद्द केले, तर जवळपास ३ हजार कोटी रुपयांचे नुकसान होईल. बीसीसीआय (BCCI) आपल्या भागधारकांशी चर्चा करून यावर मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत आहे. अशा संकटाच्या वेळी बीसीसीआयचे अधिकारी आयपीएल होईल की नाही हे सांगण्याच्या स्थितीत नाहीत,” असेही अधिकाऱ्याने सांगितले.
बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआय २ मुख्य पर्यायांवर विचार करत आहे. एक म्हणजे, आयपीएलचे आयोजन ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या टी२० विश्वचषकापूर्वी सप्टेंबरमध्ये करण्यात यावे. यासाठी विश्वचषकाचा यजमान संघ ऑस्ट्रेलिया (Australia), आयसीसी (ICC) आणि याच्याशी संबंधित इतर भागधारकांबरोबर चर्चा केली जात आहे.
दुसरा पर्याय म्हणजे, परिस्थिती सामान्य होईपर्यंत वाट पाहिली जाऊ शकते. कारण यानंतरच आयपीएलच्या आयोजनावर विचार केला जाऊ शकतो.
जगभरातील १७ लाख ७९ हजार लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. तर १ लाख ८ हजार ७७० लोकांनी आपला जीव गमावला आहे. तसेच ४ लाख २ हजार ७०९ लोक या व्हायरसमधून बरे झाले आहेत.
आरोग्य मंत्रालयानुसार, भारतात ८ हजार ३५६ लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे. तर २७३ लोकांनी आपला जीव गमावला आहे. तसेच, ७१६ लोक बरे झाले आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
-माजी क्रिकेटपटू म्हणतोय, पवार साहेबांचं क्रिकेटमधील योगदान खूप मोठे
-मुंबई क्रिकेटचे प्रशिक्षकपद सांभाळायला आवडेल पण काही अटींवर






