सिडनी शहरातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या आयोजनावर शंका निर्माण झाली होती. सिडनीतील कसोटी सामना इतरत्र हलविण्याची तयारी देखील सुरु झाली होती. मात्र क्रिकेट ऑस्ट्रेलियाने नुकत्याच दिलेल्या वृत्तानुसार सिडनीतील परिस्थती नियंत्रणात आहे. त्यामुळे सिडनी क्रिकेट मैदानावरील तिसऱ्या कसोटी सामन्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
गेल्या काही दिवसात सिडनीतील कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली होती. त्यामुळे सिडनीतील सामन्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. इतकेच नव्हे, तर सिडनीत सामना होणे शक्य नसेल मेलबर्नच्या मैदानावरच तिसरा सामना खेळवला जाईल, याची तयारी करण्यात आली होती. मात्र क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सिडनीतच सामना होईल, असे जाहीर केल्याने सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
JUST IN: The SCG has been confirmed as the venue for the third #AUSvIND Test
— cricket.com.au (@cricketcomau) December 29, 2020
याबाबत बोलताना क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निक हॉक्ले म्हणाले, “आम्ही गेल्या आठवडाभर परिस्थितीचा सतत आढावा घेत होतो. देशातील सगळे नियम लक्षात घेऊन आणि स्थानिक प्रशासनाशी चर्चा करून आम्ही तिसरा सामना सिडनीतच खेळविण्याचा निर्णय घेतला. आत्तापर्यंत आम्ही अतिशय सुरक्षित वातावरणात सामने खेळवले आहेत आणि मला खात्री आहे की सगळ्या नियमांचे पालन करून सिडनीतील तिसरा सामना आणि ब्रिस्बेन मधील चौथा सामना सुद्धा सुरक्षित वातावरणात पार पडेल.”
सिडनीतील सामन्याचे आयोजन निश्चित झाल्याने आता भारत आणि ऑस्ट्रेलिया संघाचे खेळाडू मेलबर्नमधून सिडनीसाठी रवाना होतील. कोरोनाच्या नियमामुळे या खेळाडूंना बायो बबल अर्थात जैव सुरक्षित वातावरणातून प्रवास करावा लागेल. सिडनीतील तिसऱ्या कसोटी सामन्याला ७ जानेवारीपासून सुरुवात होईल.
महत्वाच्या बातम्या:
– IND v AUS : दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया चारीमुंड्या चित! विजयासह भारताची मालिकेत १-१ ने बरोबरी
– तिसऱ्या कसोटीपूर्वी रोहितच्या पुनरागमनाबद्दल अजिंक्य रहाणेने दिली प्रतिक्रिया, म्हणाला
– क्या बात अज्जू! जॉनी मुलाघ मेडल जिंकणारा अजिंक्य रहाणे ठरला जगातील पहिलाच क्रिकेटपटू