भारतीय संघाला दुसऱ्या वनडे सामन्यात 6 विकेट्सने पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. या सामन्यात भारताचा पराभव होताच यजमान वेस्ट इंडिज संघाने मालिकेत 1-1ने बरोबरी साधली. भारतीय संघाच्या या पराभवानंतर कपिल देव यांनी वरिष्ठ खेळाडूंना चांगलेच झापले होते. ते म्हणाले होते की, पैसा आल्यामुळे काही खेळाडू खूपच अहंकारी झाले आहेत. त्यांना वाटते की, त्यांना सर्व काही माहितीये, कुठल्याही दिग्गजाचा सल्ला घ्यायचा नाहीये. अशात आता रवींद्र जडेजा याने तिसऱ्या वनडेपूर्वी माध्यमांशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली.
कपिल देव (Kapil Dev) यांनी आगपाखड केल्यानंतर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) म्हणाला की, “जेव्हाही भारतीय संघ पराभूत होतो, तेव्हा लोक अशी विधानं करतात.” त्याने असेही म्हटले की, “खेळाडूंचे लक्ष फक्त भारताला विजय मिळवून देण्यावर आहे, त्यांचा कोणताही वैयक्तिक अजेंडा नाहीये.”
जडेजा काय म्हणाला?
जडेजा मोठे भाष्य करत म्हणाला की, “प्रत्येकाला आपले मत आहे. माजी खेळाडूंना आपले मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र, मला वाटत नाही की, या संघात कोणताही अहंकार आहे. प्रत्येकजण आपल्या क्रिकेटचा आनंद घेत आहे. प्रत्येकजण मेहनती आहे. कुणीही कोणत्या गोष्टीला हलक्यात घेतले नाहीये. ते आपले 100 टक्के योगदान देत आहेत. अशी वक्तव्य सामान्यत: भारतीय संघ पराभूत झाल्यानंतरच येतात.”
‘संघाच्या रूपात चांगली कामगिरी करणे आमचा उद्देश्य’
पुढे बोलताना जडेजा म्हणाला की, “हा युवा आणि अनुभव यांचे मिश्रण असलेला चांगला संघ आहे. आम्ही भारताचे प्रतिनिधित्व करत आहोत आणि हेच आमचे मुख्य उद्देश्य आहे. कोणताही वैयक्तिक अजेंडा नाहीये.”
कपिल देव काय म्हणालेले?
यापूर्वी कपिल देव म्हणाले होते की, “माझा विश्वास आहे की, एक अनुभवी व्यक्ती मदत करू शकतो. कधी-कधी खूप पैसा आल्यामुळे अहंकारही येतो. या क्रिकेटपटूंना वाटते की, त्यांना सर्वकाही माहिती आहे. हेच अंतर आहे. मी म्हणेल की, खूप सारे क्रिकेटपटू आहेत, ज्यांना मदतीची गरज आहे. जेव्हा सुनील गावसकर आहेत, तर तुम्ही त्यांच्याशी बोलू का शकत नाहीत? अहंकार कुठे आहे? त्यांना वाटते, आम्ही खूप चांगले आहोत.”
तिसरा वनडे सामना जिंकणे लक्ष्य
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) संघातील तिसरा वनडे सामना 1 ऑगस्ट रोजी ब्रायन लारा स्टेडिअम, त्रिनिदाद येथे खेळला जाणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ मालिका नावावर करण्याचा प्रयत्न करेल. (cricketer ravindra jadeja on kapil dev team india arrogant dig said this know here)
महत्त्वाच्या बातम्या-
ब्रॉडने अखेरच्या सामन्यात केला दुर्मिळ रेकॉर्ड, कुणीच मोडू शकणार नाही ‘हा’ विक्रम!
विराटकडे वनडेत जबरदस्त रेकॉर्ड रचण्याची संधी! आजपर्यंत ‘या’ 4 दिग्गजांनाच जमलाय विक्रम