भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली बलाढ्य देशांविरुद्ध नेहमीच चमकदार कामगिरी करतो. विशेष म्हणजे, जेव्हाही भारत पाकिस्तानला भिडला आहे, तेव्हा-तेव्हा विराट पाकिस्तानला नडला आहे. अलीकडेच, त्याने आशिया चषक 2023 स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध झंझावाती शतक ठोकले होते. तो भारतीय फलंदाजी फळीच्या पाठीचा कणा आहे. आव्हानाचा पाठलाग करताना धावा कुटण्यात त्याचा हात कुणीही धरू शकत नाही. जेव्हा विराट लयीत असतो, तेव्हा तो कोणतेही गोलंदाजी आक्रमण उद्ध्वस्त करण्याची ताकद बाळगतो. अशात शनिवारी (दि. 14 ऑक्टोबर) पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याच्याकडे मोठा विक्रम रचण्याची संधी आहे. जर त्याने 93 धावा केल्या, तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा चौथा फलंदाज बनू शकतो.
विराटकडे विश्वविक्रमाची संधी
विराट कोहली (Virat Kohli) याने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात जर 93 धावा केल्या, तर त्याच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 26 हजार धावांची नोंद होईल. तो अशी कामगिरी करणारा भारताचा दुसरा खेळाडू बनेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्या नावावर आहे. सचिनने त्याच्या कारकीर्दीत 34,357 धावा केल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
34357 धावा- सचिन तेंडुलकर
28016 धावा- कुमार संगाकारा
27483 धावा- रिकी पोंटिंग
25957 धावा- महेला जयवर्धने
25907 धावा- विराट कोहली*
‘या’ दोन दिग्गजांना पछाडू शकतो विराट
विराट कोहली याने वनडे विश्वचषकात आतापर्यंत 1170 धावा केल्या आहेत. जर त्याने पाकिस्तानविरुद्ध 32 धावा केल्या, तर विश्वचकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तो शाकिब अल हसन आणि ख्रिस गेल यांना पछाडू शकतो. शाकिबच्या नावे 1201 धावा आणि गेलच्या नावे 1186 धावांची नोंद आहे.
पाकिस्तानविरुद्ध जबरदस्त प्रदर्शन
विराट कोहली याच्या पाकिस्तानविरुद्धच्या कामगिरीविषयी जाणून घ्यायचं झालं, तर त्याने 2009 ते 2023 यादरम्यान 15 सामने खेळताना 55.16च्या सरासरीने 662 धावा केल्या आहेत. यामध्ये 3 शतकांचा समावेश आहे. (cricketer virat kohli if make 93 runs in make big record most runs in international cricket 2023)
हेही वाचा-
जगातील सर्वात मोठ्या स्टेडिअममध्ये पाकिस्तानविरुद्ध भिडणार भारत; रोहितही म्हणाला, ‘आमच्या खेळाडूंना…’
विश्वचषकात विजयाची हॅट्रिक करताच कॅप्टन विलियम्सन ‘या’ 2 धुरंधरांवर भलताच खुश; म्हणाला, ‘तुम्ही इथे…’