भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याला खेळाडू परखण्याची चांगली कला अवगत असल्याचे बोलले जाते. पण आयपीएल 2023 पूर्वी त्याची ही कला चेन्नई सुपर किंग्जच्या काही आली नाहीये. सीएसके फ्रँचायझीने आयपीएल 2023 च्या लिलावापूर्वी एका अशा खेळाडूला रिलीज केले आहे, जो सध्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये वादळी खेळी करताना दिसत आहे. हा खेळाडू म्हणजे नारायण जगदीशन, ज्याने तामिळनाडू संघासाठी विजय हजारे ट्रॉफीमध्ये सलग तीन सामन्यांमध्ये शतकीय योगदान दिले आहे.
गुरुवारी (17 नोव्हेंबर) रोजी नारायण जगदीशन (Narayan Jagdeesan) याने गोवा संघाविरुद्ध खेळताना विजय हजारे ट्रॉफीत 140 चेंडूत 168 धावांची वादळी खेळी केली. जगदीशनसोबत या सामन्यात तामिळनाडूचा डाव सुरू करण्यासाठी साई सुदर्शन (Sai sudarshan) आला होता. साईने देखील 112 चेंडूत 117 धावांची खेळी केली. आयपीएलच्या मागच्या हंगामात जगदीशन 20 लाख रुपयांमध्ये सीएसकेसाठी खेळला होता. असे असले तरी सीएसकेने त्याला आगामी हंगामापूर्वी रिलीज केले. सीएसकेने रिलीज केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याने गोवा संघाविरुद्ध ही 168 धावांची खेळी केली.
विजय हजारे ट्रॉफी 2022 (Vijay Hajare Trophy 2022) मध्ये त्याचे हे सलग तिसरे शतक असून यापूर्वी 15 नोव्हेंबर रोजी छत्तीसगडविरुद्ध त्याने 107, तर 13 नोव्हेंबर रोजी आंध्र प्रदेशविरुद्ध 114 धावांची खेळी केली होती. अशात सीएसकेने जरी त्याला रिलीज केले असले तरी, आयपीएल 2023 पूर्वी सुरू होणाऱ्या लिलावात त्याला बक्कळ पैसा मिळू शकतो. जाणकारांच्या मते सीएसकेच्या तुलनेत लिलावात त्याला जास्तच रक्कम मिळेल. दरम्यान, तामिळनाडू आणि गोवा यांच्यातील या सामन्याचा विचार केला, तर तामिळनाडूने 57 धावांच्या अंतराने विजय मिळवला. गोवा संघासाठी वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकर याने 10 षटकांमध्ये 61 धावा दिल्या आणि 2 विकेट्सही घेतल्या. त्याचसोबत सुयश प्रभुदेसाई यालाही दोन विकेट मिळाल्या.
सलामीवीरांनी केलेल्या शतकांच्या जोरावर तामिळनाडूने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांमध्ये 4 विकेट्सच्या नुकसानावर 373 धावा केल्या. प्रत्युत्तरात गोवा संघ 50 षटकांमध्ये 6 विकेट्सच्या नुकसानावर 316 धावांपर्यंत पोहोचला. इशान गाडेकर, स्नेहल कौठणकर, एकनाथ केरकर या वरच्या फळीतील फलंदाजांनी गोवा संघासाठी प्रत्येकी अर्धशतक कुटले. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला सिद्धांत लाड याने नाबाद 62 धावांचे योगदान दिले. (CSK Released Narayan Jagadeesan Scores Third Consecutive Century in Vijay Hazare Trophy 2022)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराटच्या तिसऱ्या जागेचा प्रश्न मिटवण्यासाठी ‘हे’ 3 धुरंधर सज्ज, वादळी खेळीने पाडू शकतात धावांचा पाऊस
यूएईच्या गोलंदाजाने केले असे काही कृत्य, ज्यामुळे नेपाळ संघाला मिळाल्या फुकटच्या 5 धावा