गतविजेत्या इंग्लंड संघाला पराभवाचा धक्का देणाऱ्या श्रीलंका संघाची विश्वचषक 2023 स्पर्धेतील सुरुवात खूपच खराब झाली होती. त्यांनी स्पर्धेत पराभवाची हॅट्रिक केली होती. मात्र, त्यानंतर श्रीलंकेने लय पकडली. त्यांनी नेदरलँड्सला आणि त्यानंतर इंग्लंडला पराभवाची धूळ चारली. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर श्रीलंकेने इंग्लंडचा 8 विकेट्सने पराभव केला. तसेच, पॉईंट्स टेबलमध्ये 4 गुणांसह पाचवे स्थान पटकावले. इंग्लंडविरुद्ध मिळालेल्या जबरदस्त पराभवानंतर श्रीलंकेचा प्रभारी कर्णधार कुसल मेंडिस याने उपांत्य सामन्यात पोहोचण्याविषयी मोठे विधान केले.
काय म्हणाला मेंडिस?
सामना संपल्यानंतर कुसल मेंडिस (Kusal Mendis) म्हणाला, “नेट रनरेटमध्ये वाढ होणे आमच्यासाठी चांगली बाब आहे. आम्ही आज चांगली गोलंदाजी केली आणि सर्व खेळाडूंनी चांगले प्रदर्शन केले. अजून 4 सामने बाकी आहेत. जर आम्ही सलग 3 सामने जिंकलो, तर उपांत्य सामन्यात नक्की पोहोचू.”
खेळाडूंचे गुणगान गात तो म्हणाला, “सर्व खेळाडूंनी मागील सामन्यातही चांगले प्रदर्शन केले आणि आशा आहे की, आगामी सामन्यातही चांगली कामगिरी करतील. कुमाराने शानदार गोलंदाजी केली आणि तो आमच्या संघाचा मुख्य गोलंदाज आहे. मॅथ्यूजनेही चांगली गोलंदाजी केली. तो आम्हाला पर्याय देतो. कारण, तो फलंदाजीही करतो. मी भाग्यवान आहे की, त्याच्यासोबत खेळत आहे. आगामी 4 सामन्यात आम्हाला अशाचप्रकारचे प्रदर्शन करायचे आहे.”
श्रीलंकेचा सहज विजय
इंग्लंड संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी प्रथम फलंदाजी करताना इंग्लंड संघाचा डाव अवघ्या 156 धावांवर संपुष्टात आला. हे सहजसोपे आव्हान श्रीलंकेने 8 विकेट्स राखून मिळवले. यामध्ये पथुम निसांकाच्या नाबाद 77 आणि सदीरा समरविक्रमा याच्या नाबाद 65 धावांचा समावेश होता. यांचे संघाच्या विजयात मोलाचे योगदान राहिले. अशात श्रीलंकेचा पुढील सामना पुण्याच्या एमसीए स्टेडिअमवर अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. हा सामना 30 ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. या सामन्यात अफगाणिस्तानला पराभूत करून श्रीलंका विजयाची हॅट्रिक करण्याचा प्रयत्न करेल. (cwc 2023 sri lanka captain kusal mendis victory england says if we win 3 games back to back we will semis)
हेही वाचा-
इंग्लंडची शिकार करत श्रीलंकेने Points Tableमध्ये घेतली गरुडझेप, पाकिस्तानलाही दिला धक्का; वाचाच
पराभवाच्या हॅट्रिकनंतर बटलरचे धक्कादायक विधान; म्हणाला, ‘प्रामाणिकपणे सांगतो, तुम्ही रातोरात खराब…’