ऑस्ट्रेलिया संघाचा दिग्गज फलंदाज ग्लेन मॅक्सवेल याची बॅट अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात मंगळवारी (दि. 07 नोव्हेंबर) चांगलीच तळपली. वानखेडे स्टेडिअम येथे रंगलेल्या विश्वचषक 2023 स्पर्धेच्या 39व्या सामन्यात मॅक्सवेलने आजपर्यंत कुणालाच न जमलेले विक्रम करून दाखवले. त्याने एक, दोन किंवा तीनही नाही, तर तब्बल 5 विश्वविक्रम बनवले. विशेष म्हणजे, या सामन्यात तो दुखापतग्रस्त झाला होता, त्याला धावताना तीव्र वेदना होत होत्या, तो खेळता खेळता धडपडत होता, पण तरीही हार मानेल तो मॅक्सवेल कसला. त्याने एकट्याच्या जोरावर अफगाणिस्तानच्या गोलंदाजांना चोप चोप चोपले. चला तर, मॅक्सवेलने या सामन्यात केलेल्या 5 विक्रमांचा आढावा घेऊयात…
मॅक्सवेलची विक्रमी खेळी
ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) याने या सामन्यात अफगाणिस्तानच्या 292 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 128 चेंडूत नाबाद 201 धावांची द्विशतकी खेळी केली. त्याच्या या खेळीत 10 षटकार आणि तब्बल 21 चौकारांचा समावेश होता. मॅक्सवेलची ही खेळी पाहून क्रिकेट जगत त्याचे कौतुक करत आहे. चला तर, मॅक्सवेलने आपल्या या ऐतिहासिक खेळीने कोणते 5 विक्रम (Glenn Maxwell 5 Big Records) केले पाहूयात…
मॅक्सवेलने केलेले 5 विक्रम
1. सलामीला न खेळता द्विशतक करणारा पहिला खेळाडू
ग्लेन मॅक्सवेल वनडे क्रिकेटमध्ये सलामीला न खेळता द्विशतक करणारा पहिला फलंदाज बनला आहे. आतापर्यंत वनडे सामन्यात 11 द्विशतके झळकावली गेली आहेत. त्यात मॅक्सवेल हा एकमेव खेळाडू आहे, जो सलामी फलंदाज नाहीये.
2. ऑस्ट्रेलियाकडून सर्वोच्च वैयक्तिक खेळी करणारा खेळाडू
मॅक्सवेलचा दुसरा विक्रम असा की, तो ऑस्ट्रेलियाकडून वनडे पुरुष क्रिकेट सामन्यात सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या उभारणारा खेळाडू बनला आहे. त्याच्यापूर्वी शेन वॉटसन (185) याच्या नावावर सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या करण्याचा विक्रम होता. अशात हे ऑस्ट्रेलियाचे पहिले द्विशतकही आहे.
3. आव्हानाचा पाठलाग करताना सर्वोच्च धावसंख्या
वनडे क्रिकेट सामन्यात आव्हानाचा पाठलाग करताना मॅक्सवेलने सर्वोच्च धावसंख्या उभारण्याचा विक्रम केला आहे. त्याने आव्हानाचा पाठलाग करताना एका डावात 201 धावा करून फखर जमान याचा विक्रम मागे टाकला होता. फखरने 2021मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आव्हानाचा पाठलाग करताना 193 धावा केल्या होत्या.
4. सर्वात मोठी भागीदारी
ग्लेन मॅक्सवेल आणि पॅट कमिन्स (Pat Cummins) यांच्यात सातव्या विकेटसाठी वनडे क्रिकेट सामन्यात सर्वात मोठी भागीदारी झाली. दोघांमध्ये तब्बल 202 धावांची भागीदारी झाली. यापूर्वी सातव्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी 177 धावांची होती. ही भागीदारी इंग्लंडची जोडी जोस बटलर आणि आदिल रशीद यांच्या नावावर होती.
5. धावांचा यशस्वीरीत्या पाठलाग
ग्लेन मॅक्सवेल याच्या झंझावातामुळे ऑस्ट्रेलिया संघाने विश्वचषकात सर्वाधिक धावांचा यशस्वी पाठलाग केला. मॅक्सवेल आणि कमिन्सने ऑस्ट्रेलियाला अफगाणिस्तानविरुद्ध 292 धावांचे आव्हान गाठून दिले. यापूर्वी विश्वचषक 1996मध्ये ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडविरुद्ध 287 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. (cwc 23 aus vs afg glenn maxwell made 5 big records after double century against afghanistan)
हेही वाचा-
मॅक्सवेलच्या खेळीवर आख्खं जग झालं व्यक्त, पण विराटच्या रिऍक्शनने वेधलं लक्ष; म्हणाला, ‘फक्त तूच…’
तोंडचा घास हिरावताच अफगाणी कर्णधाराची सर्वात मोठी प्रतिक्रिया, स्पष्टच म्हणाला, ‘मॅक्सवेल थांबलाच नाही…’