सध्या भारताचा क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौर्यावर आहे. या दौऱ्यावर भारताने तीन वनडे आणि तीन टी२० सामन्यांची मालिका खेळली. पहिले दोन वनडे सामने गमावल्यामुळे भारतीय संघाला मालिका गमावावी लागली होती. त्यानंतर, सलग दोन सामने जिंकून भारताने टी२० मालिका आपल्या नावे केली. दोन्ही मालिकेत भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्याने आपल्या स्फोटक फलंदाजीने सर्वांचे मन जिंकली. मात्र, टी२० मालिकेत हार्दिकने असे काही केले की, ज्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पंड्याने मालिकावीर पुरस्कार दिला होता नटराजनला
हार्दिक पंड्याला टी२० मालिकेत मालिकावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. मात्र, त्याने हा पुरस्कार युवा वेगवान गोलंदाज टी नटराजन याला दिला. नटराजन प्रथमच भारतीय संघासाठी आंतरराष्ट्रीय मालिका खेळला होता. पहिल्याच टी२० मालिकेत नटराजनने तीन सामन्यांत सहा गडी बाद केले. इतकेच नव्हे, तर नटराजन या दौऱ्यातील सर्वात किफायतशीर गोलंदाज सिद्ध झाला. म्हणूनच पंड्याने आपल्याला मिळालेली मालिकावीराची ट्रॉफी नटराजनला दिली होती.
कनेरियाने केले कौतुक
हार्दिकच्या या कृतीचे पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कनेरिया याने कौतुक केले आहे. हार्दिकचे कौतुक करताना त्याने आपल्या देशातील खेळाडूंनादेखील लक्ष केले. कनेरियाने आपल्या ट्विटर हँडलवरून ट्वीट करत म्हटले, “याहून चांगले चित्र असू शकत नाही. हार्दिकने आपला मालिकावीर पुरस्कार युवा नटराजनला दिला, यातच त्याने सार्यांची मने जिंकली. यामुळे नटराजनला नक्कीच प्रेरणा मिळेल. आमच्या कोणत्याही खेळाडूने असे कृत्य कधी केले नाही.”
Great Pic can not be better ,#HardikPandya wins the hearts winning the man of the series but gives to Natarjan ,youngster must be delighted and motivated.hamaray Kisi player ney ahsa Kia khabi sub apna sochthay hai pic.twitter.com/UUSIxYmqbU
— Danish Kaneria (@DanishKaneria61) December 13, 2020
कनेरियाने टी२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यानंतरही नटराजनची स्तुती केली होती. त्या सामन्यात, भारतीय गोलंदाजांनी आपल्या २० षटकात १९४ धावा दिल्या होत्या. मात्र, नटराजनने आपल्या चार षटकात अवघ्या २० धावा देऊन ऑस्ट्रेलियाच्या धावगतीला वेसन घातली होती. नटराजनला आयपीएलमधील चमकदार कामगिरीमुळे भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर राखीव गोलंदाज म्हणून जाण्याची संधी मिळाली होती. मात्र, त्यानंतर त्याला वनडे आणि टी२० संघात समाविष्ट केले गेले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडची वेस्ट इंडिजवर मात, टेस्ट रँकिंगमध्ये पटकावला ‘हा’ क्रमांक
“इतर संघात कोण आहे कोण नाही, हे पाहण्यापेक्षा तुम्ही तुमच्या संघाबद्दल चर्चा करा”
मैदानात पुन्हा येणार ‘हिटमॅन’चं वादळ! ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रोहित होणार आज रवाना
ट्रेंडिंग लेख-
मराठीत माहिती- क्रिकेटर कुलदीप यादव
अरेरे! कांगारूविरुद्धच्या कसोटी मालिकेत ‘या’ चार भारतीय खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता कमी