वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील 24वा सामना दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडिअमवर ऑस्ट्रेलिया विरुद्ध नेदरलँड्स संघात खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाचा अनुभवी फलंदाज डेविड वॉर्नर याने दमदार कामगिरी करत तुफानी शतक झळकावले. हे त्याच्या वनडे विश्वचषक कारकीर्दीतुल सहावे शतक ठरले. यासोबतच त्याने विश्वचषकात सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजात दुसरे स्थान पटकावले.
या सामन्यात प्रथम फलंदाजी संधी मिळाल्यानंतर वॉर्नर याने ऑस्ट्रेलियाच्या डावाची जबाबदारी घेतली. स्टीव्ह स्मिथ व मार्नस लॅब्युशेन यांनी अर्धशतके झळकावत त्याला चांगली साथ दिली. वॉर्नर याने 93 चेंडूत 104 धावांची खेळी करत शतक झळकावले. त्याच्या खेळीत 3 षटकार आणि 11 चौकारांचा समावेश होता. हे वॉर्नरचे विश्वचषक इतिहासातील सहावे शतक ठरले. तसेच, एकूण वनडे कारकीर्दीतील हे 22वे शतक आहे. या विश्वचषकात वॉर्नरने आपले पहिले शतक पाकिस्तानविरुद्ध बंगळुरू येथे केले होते. यावेळी त्याने 124 चेंडूत 163 धावांची धावांची दीडशतकी खेळी केली होती.
या सहाव्या शतकासह त्याने वनडे विश्वचषकात सचिन तेंडुलकरच्या सहा शतकांची बरोबरी केली. सचिनने 44 तर वॉर्नरने 23 डावांमध्ये ही कामगिरी केली. त्याने या शतकासह श्रीलंकेचा कुमार संघकारा व ऑस्ट्रेलियाचाच माजी कर्णधार रिकी पॉंटिंग यांच्या प्रत्येकी पाच विश्वचषक शतकांना मागे सोडले. वन डे विश्वचषकात सर्वाधिक सात शतके भारताचा कर्णधार रोहित शर्मा याच्या नावे आहेत. या विश्वचषकात रोहित व वॉर्नर हे आपल्या शतकांमध्ये किती वाढ करतात हे पाहणे निर्णायक असेल.
(David Warner Hits His 6 th ODi World Cup Century)