आयपीएल २०२१ स्पर्धेत झालेल्या २३ व्या सामन्यात, सनरायजर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने ७ गडी राखून सामना आपल्या नावावर केला. हैद्राबादने दिलेल्या १७२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग चेन्नईने १८.३ षटकातच केला आणि या हंगामातील पाचवा विजय नोंदवला. आता हा सामना झाल्यानंतर डेविड वॉर्नरने पराभूत होण्यामागचे कारण सांगितले आहे.
वॉर्नरने दिली चूक झाल्याची कबुली
सनरायजर्स हैदराबाद संघाला आयपीएल २०२१ स्पर्धेत साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात देखील त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
हा सामना झाल्यानंतर दिलेल्या मुलाखतीत डेविड वॉर्नर म्हणाला, “ज्याप्रकारे मी या सामन्यात फलंदाजी केली, त्यामुळे मी या पराभवासाठी कारणीभूत आहे. अनेकदा मी शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्येकवेळी तो शॉट क्षेत्ररक्षकाच्या हातात गेला. त्यामुळे मी निराश झालो होतो. मनीष पांडेने ज्याप्रकारे फलंदाजी केली ते असाधारण होते. तसेच केनने (केन विलिअम्सन) आम्हाला सम्माननीय धावांपर्यंत पोहचवले होते. मी कदाचित १५ चांगले शॉट्स क्षेत्ररक्षकाच्या हातात खेळले. त्यानंतर मी काही करूच शकलो नाही. यामुळेच तुमचा डाव सावरतो आणि डगमगतो. जेव्हा तुम्ही शॉट क्षेत्ररक्षकांच्या हातात खेळता तेव्हा फलंदाज म्हणून निराशा येते.”
तो पुढे म्हणाला की, “आमच्याकडे बचाव करण्यासाठी १७० धावा होत्या. परंतु आम्हाला पावरप्लेच्या षटकात गडी बाद करण्यात अपयश आले होते. इथून पुनरागमन करणे कठीण होते. त्यांच्या सलामी फलंदाजांनी खरच खूप चांगली फलंदाजी केली. परंतु आम्ही शेवटी चांगला लढा दिला. असे वाटले होते की, गडी बाद केल्यानंतर तुम्ही सामन्यात पुन्हा येऊ शकता पण ते खूप पुढे होते.”
केन विलिअम्सनबद्दल देखील वॉर्नरने कौतुकोद्गार काढले. तो म्हणाला, “केन कुठल्याही क्रमांकांवर फलंदाजी करण्यास सक्षम आहे. आम्हाला इथे दिवसा ही सामने खेळायचे आहे आणि रात्री देखील. १७० हा या मैदानवरचा चांगला स्कोर आहे. आम्ही पुढच्या सामन्यात अधिक सक्षमतेने पुनरागमन करण्याचा प्रयत्न करू.”
महत्वाच्या बातम्या:
आयपीएलवर कोरोनाची सावली गडद! खेळाडूंपाठोपाठ दोन अंपायर्सनी देखील घेतली माघार
आयपीएल २०२१ : चेन्नई अव्वल, तर हा संघ तळाला, पाहा कशी आहे पॉईंट्स टेबलची स्थिती






