अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात बुधवारपासून (२४ फेब्रुवारी) ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना सुरु होत आहे. हा सामना अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमवर म्हणजेच प्रसिद्ध मोटेरा स्टेडियमवर होणार आहे. विशेष म्हणजे हा दिवस-रात्र कसोटी सामना आहे.
जून्या मोटेरा स्टेडियमची पुर्नबांधणी करण्यात आली असून आता हे स्टेडियम जगातील सर्वात मोठे स्टेडियम म्हणून ओळखले जाते. हे नव्याने बांधण्यात आलेले मोटेरा स्टेडियम जवळजवळ ६३ एकर जागेत बनले आहे. तसेच १ लाख १० हजार इतकी या स्टेडियमची आसन क्षमता आहे. आता या पुर्नबांधणी केलेल्या भव्य स्टेडियमवर भारत-इंग्लंड संघात होणारा तिसरा कसोटी सामना पहिला आंतरराष्ट्रीय सामना असेल.
त्यामुळे हे स्टेडियम भारतात होणाऱ्या दुसऱ्या दिवस-रात्र कसोटी सामन्याचेही साक्षीदार होणार आहे. याआधी भारतात २०१९ साली पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळवण्यात आला होता. तसेच भारतातील जरी हा दुसरा दिवस-रात्र कसोटी सामना असला तरी भारताचा हा एकूण तिसरा दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे. त्यामुळे या लेखात आपण भारतीय संघाच्या दिवस-रात्र कसोटी सामन्यातील कामगिरीबद्दल जाणून घेऊ.
१. भारत विरुद्ध बांगलादेश, इडन गार्डन, कोलकाता (२०१९)
भारतात सर्वात पहिला दिवस-रात्र कसोटी सामना कोलकातामधील इडन गार्डन स्टेडियमवर नोव्हेंबर २०१९ साली भारत आणि बांगलादेश संघात खेळण्यात आला होता. हा सामना भारताने एक डाव ४६ धावांनी जिंकला होता.
या सामन्यात भारताने पहिला डाव ९ बाद ३४७ धावांवर घोषित करत सामन्यात २४१ धावांची मोठी आघाडी घेतली होती. भारताकडून विराट कोहलीने १३६ धावांनी शतकी खेळी केली. बांगलादेशकडून गोलंदाजी करताना अल-अमीन हुसेन आणि इबादत हुसेन यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या होत्या.
त्याआधी बांगलादेशचा पहिला डाव १०६ धावांवर संपूष्टात आला होता. या डावात बांगलादेशकडून शादमान इस्लाम(२९), लिटॉन दास(२४) आणि नईम हसन(१९) यांनाच दोन आकडी धावसंख्या पार करता आली होती. तर भारताकडून गोलंदाजीत इशांत शर्माने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. तसेच उमेशने ३ आणि मोहम्मद शमीने २ विकेट्स घेतल्या होत्या.
त्यानंतर दुसऱ्या डावात बांगलादेशकडून दुसऱ्या डावात केवळ मुशफिकुर रहिमने ७४ धावांची खेळी करत एकाकी झुंज दिली. अन्य बांगलादेशच्या फलंदाजांना मात्र खास काही करता आले नाही. भारताकडून उमेश यादवने सर्वाधिक ५ विकेट घेतल्या होत्या तर इशांत शर्माने ४ विकेट घेतल्या होत्या.
२. ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत, ऍडलेड (२०२०)
भारताने २०२०-२१ सालात ऑस्ट्रेलिया दौरा केला होता. या दौऱ्यातील पहिला कसोटी सामना ऍडलेड येथे झाला होता. हा सामना दिवस-रात्र कसोटी सामना होता. या सामन्यात भारताला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले होते.
या सामन्यात भारताने पहिल्या डावात सर्वबाद २४४ धावा केल्या होत्या. भारताकडून कर्णधार विराटने सर्वाधिक ७४ धावा केल्या होत्या. तर ऑस्ट्रेलियाकडून मिशेल स्टार्कने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात १९१ धावाच करता आल्या. त्यामुळे भारताने ५३ धावांची आघाडी घेतली होती. या डावात ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार टिम पेनने सर्वाधिक ७३ धावा केल्या होत्या. तर भारताकडून आर अश्विनने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या होत्या.
मात्र, भारताचा दुसरा डाव केवळ ३६ धावांत संपुष्टात आला. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी फलंदाजी करताना दुखापतग्रस्त झाल्याने भारताला ९ बाद ३६ धावांवर हा डाव थांबवावा लागला होता. ही भारताची कसोटीमधील निचांकी धावसंख्या ठरली. यानंतर ऑस्ट्रेलियाने ९० धावांचे आव्हान २ विकेट्स गमावत सहज पार केले.
महत्त्वाच्या बातम्या –
“लंबी रेस का घोडा है इशांत”, हे वाक्य अक्षरश: त्याने खरं करुन दाखवलं
इंग्लंडविरुद्ध दिवस-रात्र कसोटी सामना जिंकू शकतो भारतीय संघ, ‘ही’ आहेत ३ कारणे
दिवस-रात्र कसोटीआधी रिषभ पंतची मस्ती, विराट कोहलीलाही घाबरवले; पाहा व्हिडिओ






