मुंबई इंडियन्स विरुद्ध झालेल्या रंगतदार सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने विजय मिळवला. दिल्लीला मुंबईने केवळ १३८ धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र त्याचा पाठलाग करतांना दिल्लीने काहीसा रडतखडत आपला विजय पूर्ण केला. या लक्ष्याचा पाठलाग करतांना दिल्लीने पृथ्वी शॉची विकेट लवकर गमावली. मात्र त्यांनतर शिखर धवन आणि स्टीव्ह स्मिथने भागीदारी करत दिल्लीच्या विजयाचा पाया रचला.
मात्र शिखर धवन ४५ धावांवर आणि स्टीव स्मिथ ३३ धावांवर बाद झाल्यावर सामन्यात चुरस निर्माण झाली होती. त्यांनतर कर्णधार रिषभ पंत देखील अवघ्या ७ धावा काढून बाद झाला. मात्र ललित यादव (नाबाद २२) आणि शिम्रोन हेटमायर (नाबाद १४) यांनी संयमी फलंदाजी करत दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
पहिल्या डावात मुंबईची हाराकिरी
दरम्यान या सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना हाराकिरी केली. दिल्लीच्या भेदक गोलंदाजीसमोर निर्धारित २० षटकात त्यांनी केवळ ९ बाद १३७ धावा करत आल्या. त्यामुळे दिल्लीला हंगामातील तिसरा विजय मिळवण्यासाठी आता १३८ धावांचे लक्ष्य मिळाले होते.
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नईच्या मैदानावर सुरु असलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करतांना दमदार सुरुवात केली होती. मात्र त्यांनतर थोड्याच अंतराने विकेट्स गमावल्याने त्यांची काहीशी नाजूक अवस्था झाली. अमित मिश्राने मुंबईची मधली फळी कापून काढली. त्याने रोहित शर्मा, इशान किशन, हार्दिक पंड्या आणि किरोन पोलार्ड अशा सगळ्यात महत्वाच्या विकेट्स पटकावल्या. त्याची ४ षटकात २४ धावा देऊन घेतलेल्या ४ विकेट्स या आयपीएल मधील दिल्लीच्या गोलंदाजाने मुंबई विरुद्ध केलेली सर्वोत्तम कामगिरी ठरली.
मुंबई कडून रोहित शर्माने ३० चेंडूत ४४ धावा केल्या. तर अखेरीस इशान किशनने २८ चेंडूत २६ धावा करत एकाकी झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या व्यतिरिक्त एकाही मुंबईच्या फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.
नाणेफेक जिंकून मुंबईचा फलंदाजीचा निर्णय
तत्पूर्वी, या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबई इंडियन्सने या सामन्यात प्लेईंग इलेव्हन मध्ये धाडसी बदल करत एडम मिल्नेला वगळले आहे आणि ऑफस्पिनर जयंत यादवला संघात स्थान दिले आहे. तर दिल्लीने देखील संघात दोन बदल केले आहेत. लुकमन मेरीवाला आणि ख्रिस वोक्स यांना दिल्लीने वगळले असून अमित मिश्रा आणि शिम्रोन हेटमायर यांना संघात स्थान दिले आहे.
अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
दिल्ली कॅपिटल्स – शिखर धवन, पृथ्वी शॉ, स्टीव स्मिथ, रिषभ पंत (कर्णधार व यष्टीरक्षक), मार्कस स्टॉयनिस, ललित यादव, शिम्रोन हेटमायर, अमित मिश्रा, आर अश्विन, अवेश खान, कॅगिसो रबाडा
मुंबई इंडियन्स – क्विंटन डी कॉक(यष्टीरक्षक), रोहित शर्मा(कर्णधार), सूर्यकुमार यादव, इशान किशन, किरोन पोलार्ड, कृणाल पांड्या, हार्दिक पांड्या, जयंत यादव, राहुल चाहर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट