आयपीएलच्या या हंगामातील 11 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने दिल्लीच्या कॅपिटल्सला 15 धावांच्या फरकाने पराभूत केले. या सामन्यात सनरायझर्सच्या सर्व खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी बजावली, विशेषतः अनुभवी फलंदाज केन विलियम्सन आणि फिरकीपटू रशीद खान यांनी मोलाची कामगिरी केली. परंतु कर्णधार डेविड वॉर्नर युवा फिरकीपटू अभिषेक शर्माच्या कामगिरीने खूष झाला आहे. सामन्यानंतर त्याने त्याची प्रशंसा केली.
अभिषेक शर्मा करतोय चांगली गोलंदाजी
तो म्हणाला “आम्ही नाणेफेक गमावली तरीही सामना जिंकला याचा आनंद झाला. दुर्दैवाने अष्टपैलू मिशेल मार्शला पहिल्या सामन्यात दुखापत झाली होती, संघात त्याची जागा कोण भरून काढेल याचा विचार आम्ही करत होतो. अभिषेक शर्मा संघात आला आणि त्याने शानदार गोलंदाजी केली. तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे, त्यामुळे आता आम्हाला मार्शच्या जागी एक चांगला गोलंदाज मिळाला आहे.” अभिषेकने या सामन्यात एकही विकेट घेतली नसली तरी त्याने ४ षटके गोलंदाजी केली होती.
गोलंदाज करत आहेत चांगली कामगिरी
गोलंदाजांची प्रशंसा करतांना वॉर्नर म्हणाला, “आम्ही आमच्या गोलंदाजी विभागात खरोखरच कठोर परिश्रम घेत आहोत. आमच्या गोलंदाजांनी सुरुवातीला नवीन चेंडूने आणि नंतर डेथ ओव्हरमध्येही चांगली गोलंदाजी केली.”
उष्ण वातावरणात धाव घेणे कठीण
संघाच्या फलंदाजीबद्दल बोलताना वॉर्नर म्हणाला, “आमचे फलंदाज खेळपट्टीवर वेगवान धावा घेत आहोत. या उष्ण वातावरणात जलदगतीने धावा घेणे खूप मोठे आव्हान आहे. मी आज काही मोठे फटके खेळले, माझ्या या प्रदर्शनामुळे मी आनंदित आहे.”
या सामन्यात प्रथम फलंदाजीस उतरलेल्या हैदराबाद संघाचे सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नर आणि जॉनी बेयरस्टो यांनी संघाला चांगली सुरुवात करुन दिली होती. बेयरस्टोने ४८ चेंडूत २ चौकार आणि १ षटकार मारत सर्वाधिक ५३ धावा केल्या. तर वॉर्नरनेही ३३ चेंडूत ४५ धावा ठोकल्या. तसेच केन विलियम्सननेही ४१ धावांचे योगदान दिले होते. त्यामुळे हैदराबादने दिल्लीला १६३ धावांचे आव्हान दिले होते. ह्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली संघ २० षटकात ७ विकेट्स गमावत १४७ धावाच करु शकला. हैदराबादकडून रशीदने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. रशीदच या सामन्यातील सामनावीर ठरला.