भारताचा महत्वाचा वेगवान गोलंदाज दीपक चाहर सध्या राष्ट्रीय संघातून बाहेर आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या मायदेशातील मालिकेत त्याला दुखापत झाली होती. तेव्हापासून चाहर संघातून बाहेर आहे आणि दुखापतीतून सावरण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्याला पूर्णपणे फिट होण्यासाठी अजून चार ते पाच आठवड्यांचा वेळ लागणार असल्याचे त्याने स्वतः सांगितले आहे.
दीपक चाहर (Deepak Chahar) मागच्या बऱ्याच दिवसांपासून हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीशी झगडत आहे. सध्या तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमी म्हणजेच एनसीएमध्ये पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण करत आहे. त्याठिकाणी चाहरसोबत विशिंगटन सुंदर (Washington Sundar) आणि टी नटराजन (T Natarajan) देखील आहेत. हे तिन्ही खेळाडू भारतीय संघासाठी महत्वाचे असून एनसीएचे फिजिओ आणि प्रशिक्षक त्यांच्या फिटनेसवर नजर ठेवून आहेत.