आयपीएल २०२६ मध्ये आपला शेवटचा लीग सामना जिंकत दिल्ली कॅपिटल्सने गोड शेवट केला, मात्र त्यांना प्लेऑफमध्ये पोहोचता आले नाही. रविवारी (२४ मे) ईडन गार्डन्सवर दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स भिडले. हा सामना दिल्लीने ४० धावांनी जिंकला आणि त्यांचे १४ गुण झाले. ते १६ गुण मिळवत या हंगामात प्लेऑफचे दावेदार बनू शकले असते, मात्र एका धावेने दिल्लीचा संपूर्ण हंगाम खराब केला. त्या एका धावेमुळे त्यांना दोन गुण गमवावे लागले आणि अव्वल चारमध्ये स्थान मिळवण्याची क्षमता असूनही सहाव्या स्थानी राहिले.
दिल्लीची कामगिरी पाहिली तर त्यांनी पहिले दोन सामने जिंकत चांगली सुरूवात केली होती, मात्र तिसऱ्या सामन्यात जे जिंकण्याच्या अगदी जवळ होते. गुजरात टायटन्स विरुद्ध २११ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी डीसीला शेवटच्या षटकात १३ धावांची आवश्यकता होती. प्रसिद्ध कृष्णाच्या त्या षटकात विपराज निगमने पहिल्याच चेंडूवर चौकार मारला, मात्र पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. कुलदीप यादव क्रीजवर आला आणि त्याने तिसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली. डेव्हिड मिलरने पुढच्याच चेंडूवर षटकार मारून दिल्लीचा विजय जवळजवळ निश्चित केला होता.
दिल्लीला विजयासाठी शेवटच्या दोन चेंडूंवर दोन धावांची आवश्यकता होता. मिलर क्रीजवर होता आणि त्याने पाचवा चेंडू डीप स्क्वेयर लेगच्या दिशेने खेळला. त्यावेळी त्याला एकेरी धाव सहज घेता आली असती, मात्र तसे झाले नाही. शेवटच्या चेंडूवर दोन धावांची गरज असताना कुलदीप धावबाद झाला आणि दिल्लीने हा सामना एका धावेने गमावला.
जर मिलरने ती एकेरी धाव घेतली असती तर कदाचित दिल्ली प्लेऑफसाठी पात्र ठरली असती. हा सामना बरोबरीत सुटला असता आणि शेवटच्या चेंडूवर एक धाव घेतली असती किंवा खेळाडू बाद झाला असता तर सामना सुपर ओव्हरमध्ये गेला असता. मिलरच्या एका चुकीमुळे दिल्लीला दोन गुणांचे नुकसान झाले आणि त्यांची लयही बिघडली, कारण पुढचा सामना त्यांनी गमावला.






